प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
आयुक्त शिंदे यांची ‘मुंबई मॅरेथॉन'मध्ये उल्लेखनीय धाव
नवी मुंबई : धावणे सर्वोत्तम व्यायाम असल्याचे मनोमन जाणून आपली धावण्याची आवड ध्यासात परिवर्तन करणारे आणि आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातूनही पहाटे लवकर धावण्याचा नियमित सराव करणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या टाटा मुंबई मॅरेथॉन अकराव्यांदा सहभागी होत ४२ किलोमीटरचे अंतर ४ तास ३९ मिनिटे २३ सेकंदात पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटुंचा सहभाग असणाऱ्या या मुंबई मॅरेथॉन मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
गतवर्षी आयुक्त शिंदे यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जागतिक स्तरावरील मानाच्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन'मध्ये सहभागी होत ८६.६ किलोमीटर अंतर ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण केले होते. या जागतिक ‘मॅरेथॉन'मध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन मध्येही सहभागी होत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
नुकतीच नवी मुंबई महापालिका निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडली असून महापालिका निवडणुकांच्या अत्यंत व्यस्त कामकाजाच्या कालावधीतही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव करुन आणि वेळेत कार्यालयात येऊन, पुन्हा उशिरापर्यंत कार्यालयीन कामकाज केले; मात्र सरावात खंड पडू दिला नाही.
यावेळी पहिल्यांदाच ‘टाटा मुंबई मॅरेथॉन'च्या मार्गात कोस्टल रोडचा समावेश होता. या उल्लेखनीय यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.