खारघर मधील शिल्प चौक अंधारात

खारघर : पनवेल महापालिका तर्फे खारघर सेवटर-२० मधील शिल्प चौकाचे सुशोभीकरण करुन शिल्प चौक दिव्यांनी प्रकाशमय केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिल्प चौकातील पथदिवे बंद असल्याने खारघर शहरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर शहर निर्माण केल्यानंतर सिडको तर्फे खारघर सेक्टर-२० मध्ये शिल्प चौक तर खारघर सेक्टर-४ मध्ये  उत्सव चौक उभारण्यात आला आहे. या चौकांतील कारंजे आणि विद्युत दिव्यांची रोषणाई यामुळे खारघर शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. विशेष म्हणजे  शिल्प चौकात नागरिकांची वर्दळ असते. शिल्प चौकाच्या चारही बाजूने रस्ते, दोन्ही बाजूला उद्यान, बस थांबा, बँका आणि विविध साहित्याची दुकाने असल्यामुळे शिल्प चौकात नागरिकांची सतत वर्दळ असते.

दरम्यान, मागील वर्षी पनवेल महापालिका तर्फे शिल्प चौकाचे सुशोभीकरण करुन शिल्प चौकात विद्युत रोषणाई आणि कारंजे सुरु करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने शिल्प चौकावर अंधार पसरला असून, शिल्प चौकातील अंधाराकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने खारघर मधील नागरिक महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यवत करीत आहेत. याबाबत, महापालिका खारघर प्रभाग अधिकारी रुपाली माने यांच्याशी संपर्क केला असता, होवू शकला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्त्यांवर धूळ प्रतिबंधक सखोल स्वच्छता मोहीम