‘ठाणे तिथे काय उणे'

ठाणेः पूर्वी ‘पुणे तिथे काय उणेे' म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणेे' असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहेे, असे प्रतिपादन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचा व्यापक आराखडा मांडला. दरम्यान, ‘आमचा अजेंडा फक्त विकासाचा आहे; मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे हेच आमचे ध्येय आहे,' असे स्पष्ट करत त्यांनी ‘ठाणे पॅटर्न' देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला.
‘क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट'तर्फे आयोजित २३ व्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपस्थित विकासक, बँक अधिकारी आणि मान्यवरांना शुभेच्छा देताना त्यांनी ‘चलो ठाणे' असे गाणे सर्वत्र व्हायरल करण्याचे आवाहन केले. येताना टनेल मशीन पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी सुरु असलेल्या पायाभूत प्रकल्पांची गती अधोरेखित केली. सकाळी उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसले तरी आपण दरवर्षी या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये सहभागी होत असल्याचे स्पष्ट व्ोÀले.
ठाणेमध्ये ५० लाखांपासून १२ कोटींपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असून, या ‘प्रदर्शन'मुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. घर देणं हा आशीर्वाद आहे, असे नमूद करत एसआरए आणि म्हाडा प्रकल्पांमध्ये घरांच्या चाव्या देताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वात मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख घरांचे स्वप्न दाखवले होते, ते पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिका, सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात असून, मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथे १७ हजार घरांची कामे सुरु आहेत. २० वर्षे भाडे न मिळालेल्या नागरिकांना १६० कोटी रुपयांचा निधी देऊन न्याय दिल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईप्रमाणे ठाणेही झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धारही ना. शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे, वडाळा, घाटकोपर, गायमुख, मिरा-भाईंदर असा मेट्रो लूप तयार होत असून, ठाणे-भिवंडी-कल्याण-अंबरनाथ-तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. ३३७ कि.मी. मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ठाणेमध्ये अंतर्गत मेट्रो सुरु होत असून ती मुख्य मेट्रोला जोडली जाणार आहे. ठाणे-बोरिवली प्रवास २ तासांवरुन १२ मिनिटांवर आणण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल उभारण्यात आले असून, पर्यावरणाचे रक्षण करत सदर प्रकल्प पूर्ण केला जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी  यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक समस्येवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येत असून मुंबई आणि ठाणेतही तो उभारला जाणार आहे. पॉड टॅक्सी मॉल्सपर्यंतही जाणार असल्याने नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत. रस्ते, मेट्रो आणि पॉड टॅक्सीमुळे वाहतूक सुरळीत राहणार असल्याचा विश्वास नामदार शिंदे यांनी व्यक्त केला.
घोडबंदर रोड ३०० फुट करण्यात आला असून एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीए यांचे तीन मोठे ब्रिज उभारले जात आहेत. गायमुख परिसरातून ग्रामीण भाग जोडून ‘नवीन ठाणे' विकसित केले जाणार आहे. यामुळे ठाणेतील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच ठाणेमध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट सुरु करण्याची योजना असून सेंटर पार्क, गायमुख चौपाटी आणि इतर प्रकल्पांमुळे शहराचा कायापालट होत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रसंगी ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, दोस्ती ग्रुपचे राजूभाई गरोडीया, एमसीएचआय ठाणे शाखा अध्यक्ष सचिन मीराणी, बोरकर रिएल्टीचे संजय बोरकर, नगरसेवक संजय भोईर, विकासक जय बोरा तसेच विविध विकासक, प्रमुख बँकांचे कर्ज विभागातील अधिकारी आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांदळवन संरक्षणासाठी कायदा करुन ग्रीन टीडीआर देण्याचा निर्णय घ्ोतला आहे. प्रत्येक प्रकल्प पर्यावरणपूरक असावा. नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असून परवडणारी घरे बांधणे विकासकांसाठी आवश्यक आहे. रिअल इस्टेट क्षेत्र कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे असून २५० उद्योग या क्षेत्रावर अवलंबून आहेत.
-ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इतिहासाच्या पाऊलवाटेवर बहु सांस्कृतिक ठाणे