भाजपसोबत समझोता नाही-प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : भाजप हा मनुवादी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत कोणताही समझोता होणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधी भूमिका स्पष्ट केली. वाशी येथील विष्णुदास भावे नाटÎगृहात सोमवारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे आयोजित कामगार मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, संघ, काँग्रेस आणि इतर पुरोगामी पक्षांवर टीका केली. तसेच वंचित ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर देत, पुरोगामी पक्षासोबत आम्ही युतीसाठी तयार आहोत, पण मनुवादी विचारसरणीशी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

उद्या भाजपसोबत बसलो तर तुमच्याकडे एक हाडही चघळायला उरणार नाही, असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत युतीची दारे अजूनही खुली असल्याचे संकेत देत, वंचित आघाडी ही कोणाच्याही दबावाखाली न चालणारी चळवळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले, सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे मतविभाजन वाढेल. अशा स्थितीत स्वतंत्र उमेदवारांना अधिक वाव आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी लगेच तयारी सुरु करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

आंबेडकरी चळवळीच्या बळावर सत्ता मिळवता येऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या दिवशी आपण चळवळीशी खरी बांधिलकी निर्माण करु, त्या दिवशी सत्तेची पायरी चढू असे स्पष्ट केले. केवळ, आंदोलने करुन न्याय मिळत नाही. महापालिकेत कामगारांचा आवाज पोहोचवायचा असेल, तर किमान 15 उमेदवार निवडून आणावे लागतील. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरवली जाणार असून, मनुवादी पक्षांपासून दूर राहून पुरोगामी शक्तींसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचा संदेश आंबेडकरांनी दिला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे