भिवंडीत अनियमित पाणी पुरवठा

भिवंडीः भिवंडी महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत असून महापालिकेचे अधिकारी जुन्या जलवाहिनीचे कारण देत आहेत. तर महापालिकाकडे मुबलक पाणी असून शहरात होणारी पाणी चोरी आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने अनियमितता असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्षभरात ठिकठिकाणाहून पाण्याच्या तक्रारी महापालिकाकडे येत असून कधी-कधी पाण्यासाठी मोर्चे देखील काढले जात आहे. या तक्रारीची महापालिका प्रशासनाने गंभीर दाखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

भिवंडी महापालिका हद्दीत असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोेताकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने शहरात पाणी टंचाई होत असल्याचे शहरवासियांचे म्हणणे आहे. नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून विविध संस्थांकडून पाणी विकत घेत आहे. सध्या महापालिका ‘स्टेम'कडून ७३ एमएलडी, मुंबई महापालिकाकडून ४२ एमएलडी पाणी विकत घेत आहे. त्यामध्ये वऱ्हाळा तलावाचे ५ एमएलडी पाण्याची भर घालून शहरातील नागरिकांना १२० एमएलडी पाणी पुरवठा करीत आहे. सदर पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने शहरात गरजेनुसार १३ पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. एसटी स्थानकाजवळ २, चावींद्रा १, इंदिरागांधी रुग्णालय २, शांतीनगर १, नवीवस्ती १, कामतघर १, नारपोली १, साठेनगर १, वऱ्हाळा तलाव २, नागांव १ अशा पाण्याच्या टाक्यांमधून सध्या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. त्यापैकी नागांव येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम कमकुवत झाल्याने पाडण्यात आली. त्यामुळे १२ टाक्यांमधून पाणीपुरवठा होत आहे.

या सर्व भागात लोकवस्ती वाढल्याने टप्प्याप्प्याने टाकीत पाण्याची साठवणूक करुन नागरिकांना दूरदूरवर पाणीपुरवठा केल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी-अधिक प्रमाणात पाणी मिळते. नागरिकांना पाणी मिळावे म्हणून महापालिकेने काही ठिकाणी बुस्टर लावले आहेत. या पाणी पुरवठ्यास उच्च दाब (प्रेशर) नसल्याने शहरातील जवळजवळ सर्वच नागरिकांना विजेच्या मशीनद्वारे पाणी खेचून घरात आणावे लागते. तर काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपांमुळे  त्यांच्या वार्डात जास्त वेळ पाणी पुरवठा असतो. परिणामी, इतरांना कमी वेळेत पाणी मिळते. या सर्व बाबींकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गांभिर्याने लक्ष देत  सर्वाना समान पाणीपुरवठा केला पाहिजे, असे शहरवासियांचे मत आहे.  

अमृत -२ योजना निधीतून काम सुरु...
भिवंडीकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नव्याने महापालिकेने १६ टाक्या बांधल्या असून त्यामध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी शासनाकडून १०० एमएलडी पाणी मंजूर केले आहे. सदर पाणी भादसा-पिसे धरणातून उचलले जाणार असून ते शहरातील विविध भागात पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेच्या निधीतून काम सुरु झाले आहे. सदर काम येत्या २ वर्षात पूर्ण होईल. त्यावेळी शहरातील सर्व भागातील नागरिकांना नियमित आणि प्रेशरने पाणी मिळेल.
-संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता, भिवंडी महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कासाडी नदीचे पालटणार रुपडे