प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
निवडणुकीत निष्ठवंतांची नाराजी भोवली
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत यावेळेस प्रस्थापित राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मूक संतापाने मोठे आव्हान दिले असून, शहराच्या राजकीय पटलावर एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘वंशवाद विरुध्द निष्ठावंत कार्यकर्ता' अशा रंगात आलेल्या या लढाईत मतदारांनी आणि नाराज कार्यकर्त्यांनी अनेक बड्या नेत्यांना जोरदार झटका दिला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भाजपा'च्या हेमा पिजानी यांनाही आपली जागा राखता आली नाही, ज्यातून घराणेशाहीच्या राजकारणाविरोधातील जनभावना स्पष्टपणे दिसून येत आहेत.
या राजकीय उलथापालथीची बीजे तिकीट वाटपाच्या वेळीच पेरली गेली होती. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने अनेक दशकांपासून पक्षासाठी झटणाऱ्या जमिनीवरील कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना झुकते माप दिले होते. शिंदे गट, ओमी टीम आणि साई पक्ष यांच्यातील ३५-३२-११ च्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार, काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील ३-३ उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले होते. धनंजय बोडारे, राजेंद्रसिंह भुल्लर, विजय पाटील, राजू जग्यासी आणि जमनू पुरसवानी यासारख्या प्रभावशाली नेत्यांच्या कुटुंबांना दिलेल्या या प्राधान्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.
निवडणुकीच्या निकालातून या अंतर्गत वादाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. पॅनेल क्रमांक-१५ मध्ये ‘भाजपा'मध्ये प्रवेश केलेल्या धनंजय बोडारे यांच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबातील एकाही उमेदवाराला मतदारांनी स्वीकारले नाही. त्याचप्रमाणे ‘शिंदे सेना'चे राजेंद्रसिंह भुल्लर यांचे पुत्र विक्की भुल्लर यांनाही स्थानिक प्रबळ जनसंपर्क असूनही पराभवाचा सामना करावा लागला. कॅम्प क्र.५ मधील विजय पाटील यांच्या कुटुंबासाठी तर निकाल अत्यंत मानहानीकारक ठरला असून त्यांच्या तिन्ही उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. यासोबतच माजी उपमहापौर भगवान भालेराव आणि त्यांच्या पत्नी अपेक्षा तसेच प्रमोद टाले आणि त्यांची कन्या आकाशा यांनाही जनतेने नाकारले आहे.
या घराणेशाहीच्या लाटेत ‘भाजपा'चे शेरी लुंड कुटुंब मात्र अपवाद ठरले, ज्यांनी पॅनेल क्रमांक-१६ आणि १७ मधून आपल्या तिन्ही जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे, राजू जग्यासी आणि जमनू पुरसवानी यांना केवळ स्वतःची किंवा कुटुंबाची वैयक्तिक प्रतिष्ठा कशीबशी वाचवता आली. मात्र, त्यांना आपल्या पॅनेलमध्ये पूर्ण विजय मिळवता आला नाही. २०२६ सालची महापालिका निवडणूक राजकीय नेतृत्वासाठी एक मोठा धडा ठरली आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा बाजुला सारुन केवळ कौटुंबिक हित जपल्यास मतपेटीतून त्याची मोठी किंमत मोजावी लागते, हेच या निकालाने अधोरेखित केले आहे.