कोजागिरीच्या गजल मैफलीत रसिक मंत्रमुग्ध
नवी मुंबई : कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून ‘नवी मुंबई प्रेस क्लब'तर्फे आयोजित गज़ल नवाज़ भीमराव पांचाळे यांच्या ‘तू नभातले तारे...' या गज़ल मैफलीस श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निमित्ताने शहरातील राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. कोजागरीच्या शीतल चांदण्यात दुग्धपानाचा आस्वाद घेत हजारो रसिकांनी एकमेकांची विचारपूस करत कोजागिरी साजरी केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुलेखनकार अच्युत पालव, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार प्रापत गज़लनवाज़ भीमराव पांचाळे आणिमहाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्रापत नवी मुंबईतील पहिले मान्यवर सुभाष कुळकर्णी यांना वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याशिवाय नवी मुंबई शहराच्या निर्मितीनंतर येथील सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात गत ४०-५० वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या तसेच नवी मुंबईच्या जडण-घडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना देखील ‘नवी मुंबई प्रेस क्लब'च्या वतीने गौरविण्यात आले. यामध्ये साहित्य, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारे डॉ. नंदरकिशोर जोशी, वाशी रहिवाशी संघ, सहकारी ग्राहक संस्था, मराठी साहित्य संस्कृती मंडळ व कवी कुसुमाग्रज वाचनालय संस्थेच्या माध्यमातून या शहराच्या सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे ललित पाठक, महिला व बालकल्याण क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱया सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका प्रा. वृषाली मगदूम, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, बँकिंग क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले तसेच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमठवणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबईचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड या गौरवमुर्तींचा समावेश होता.
याप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी अनिल पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, डॉ. राहुल गेठे, ‘मनसे'चे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गजल मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध...
गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी सादर केलेल्या तू नभातले तारे, अंदाज आरशाचा, हा असा चंद्र ही अशी रात फिरायासाठी, नाही म्हणावयाला आता असे करुया या गजलांना रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी सादर केलेली चांदण्यासाठी हे असे जगणे आता पुरे, करते थोडी स्वपने गोळा आणि रोशनीचे कायदे पाळायचे या गज़लांनी रसिकांची वाहवा मिळवली. भीमराव पांचाळे यांनी गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय या सादर केलेल्या भैरवीला रसिकांनी स्वतः साथ देत मनमुराद दाद दिली. गजल मैफलीत मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांनी कोजागरीची रात्र संपूच नये, अशी भावना व्यक्त केली.