माथाडी कामगारांवरील अन्यायाविरोधात मोर्चा

एपीएमसी : किराणा बाजार-दुकाने मंडळ तसेच मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळातील कामगारांच्या कामामध्ये मंडळ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेप आणि चुकीच्या कृतीमुळे होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या वतीने १३ मार्च रोजी माथाडी भवन ते फळ मार्केट येथील मंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व माथाडी कामगार नेते, ‘संघटना'चे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील तसेच माथाडी कामगार नेते, ‘संघटना'चे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. या मोर्चामध्ये ‘संघटना'चे पदाधिकारी तसेच माथाडी कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान उपस्थित माथाडी कामगारांना संबोधित करताना आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये माथाडी कामगारांच्या कार्यक्षेत्रामध्ये काही बोगस टोळ्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून मंडळातील काही अधिकारी, पोलीस यंत्रणा तसेच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली भ्रष्ट साखळी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उभी राहिलेली आपली ऐतिहासिक चळवळ आजही कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे. मात्र, काही क्षुल्लक सभासद असलेल्या संघटनांच्या दबावामुळे मंडळातील काही अधिकारी कामगारांच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करत असल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या हस्तक्षेपामुळे आणि प्रशासनातील भ्रष्ट साखळीमुळे माथाडी कामगारांच्या हक्कांवर गदा येत असून त्यांच्या रोजगारावर आणि उपजीविकेवर परिणाम होत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

शासनाच्या माध्यमातून माथाडी कामगारांच्या या प्रलंबित समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात आला नाही, तर ‘माथाडी कामगार युनियन'च्या वतीने तमाम माथाडी कामगार संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरतील. आजचा मोर्चा केवळ इशारा असून शासनाने याची वरिष्ठ पातळीवर तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही आमदार शिंदे यांनी यावेळी केली.

तसेच या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी निवेदन देण्यात आले असून सदर प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर विधीमंडळातील चर्चेमध्येही माथाडी मंडळाच्या कारभाराची दखल घेतली गेली नाही, तर लाखो माथाडी कामगार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही आ. शशिकांत शिंदे यांनी दिला.

सदर समस्येबाबत ‘संघटना'च्या वतीने निवेदनाद्वारे किराणा बाजार-दुकाने मंडळ तसेच मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळाला जाब विचारण्यात आला असून, यासंदर्भात ८ दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याचे मंडळाने मान्य केले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या मोर्चामध्ये ‘संघटना'चे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, दिलीप खोंड यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच माथाडी कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एआय'मुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस