प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नववर्ष दिनी टिटवाळा गणपती मंदिरात भक्तांचा महापूर
कल्याण : नववर्ष स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील देवस्थाने भक्तांनी गजबजून गेली आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा सिध्दीविनायक मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी झाली. यावेळी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा वाढत गेल्या आणि काही वेळातच संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी खचाखच भरुन गेले.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण भागांतून मोठ्या संख्येने भक्त बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले होते. गणरायाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. तलावातील बोटींग, मुलांसाठी असलेली खेळण्यांची दुकाने, फुगे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप लाभले. वाढत्या गर्दीमुळे फुल, नारळ आणि पुजा साहित्य विक्रेत्यांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली.
मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, रांग व्यवस्थापन, स्वच्छतागृहे या सुविधा उपलब्ध करुन शिस्तबध्द व्यवस्था राखली. पहाटे ४ वाजता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि भाविकांची लाट दिवसभर कायम राहिली. मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी सांगितले की, नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्याची परंपरा गेल्या दशकभरापासून अधिक बळकट झाली आहे. सकाळपासूनच सुमारे १ लाख भाविकांनी दर्शन घेतले असून ती संख्या रात्रीपर्यंत लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्था मजबूत केली. काही ठिकाणी अल्पकाळ वाहतूक कोंडी झाली असली तरी पर्यायी मार्गांचा वापर करुन परिस्थिती सुरळीत करण्यात आली.
यावेळी नरेंद्र महाराज सांप्रदायाचे सेवेकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांना मदत करताना दिसले. त्यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत सामाजिक जागृतीचा संदेशही दिला. भवतीभाव, सेवा आणि सामाजिक कर्तव्यभावना या तिन्हींचा सुंदर संगम नववर्षाच्या शुभप्रसंगी टिटवाळा येथे पाहायला मिळाला. बाप्पाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात झाल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहताना दिसला. अनेकांसाठी ती अनुभूती केवळ धार्मिक नव्हे तर मनःशांती देणारी ठरल्याचे पहायला मिळाले.