‘हिंद-दी-चादर' शहिदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर' या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सविस्तर आढावा घेतला. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षतेने आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला ‘रायगड'चे जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपायुक्त विजय म्हसाळ, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, रश्मी करंदीकर, नियोजन उपायुक्त प्रमोद केंभावी, कार्यक्रमाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड यांच्यासह कोकण विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जेएनपीए आणि सिडको प्राधिकरणाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीस उपस्थित होते.  

आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रुपरेषा, जनजागृती, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.

‘हिंद-दी-चादर' अंतर्गत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीततेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरु केली आहे. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी शासकीय अधिकारी, गुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजघटकांच्या सहभागातून तब्बल २५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, शौर्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे. प्रत्येक विभागाने प्रचार-प्रसाराचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी सर्व यंत्रणांना दिले.  

राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम समितीच्या तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव, वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानावर सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नवी मुंबईसह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, भोजन, निवास, प्रसिध्दी, जलपुरवठा, विद्युत व्यवस्था आदि सर्व बाबींसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यानुषंगाने प्रशासनाव्दारे सर्वंकष तयारी करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अंबरनाथ'च्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अजब कारभार