प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
घटनात्मक पायाभरणीमुळे भारतीय लोकशाही सशक्त -राज्यपाल
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. ‘संविधान'मधील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, ना. मंगलप्रभात लोढा, ॲड.आशिष शेलार, ना. संजय राठोड, ना. संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे, आदि उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सर्व भिक्खुंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी यावेळी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लंडन स्वुÀल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया'ची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड' आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी' या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतभर साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमान आणि विवेकाचा उत्सव असून त्यांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घ्ोऊन देशाचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. चैत्यभूमी बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.