प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मिरा-भाईंदर पोलिसांकडून राजस्थान मधील अंमली पदार्थाचा कारखाना उघडकीस
भाईंदर : मिरा-रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याचा तपास करत असताना राजस्थान राज्यातील झुनझुनु गावातील अंमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांनी १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
मिरा-रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक ४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना ६ इसमांची संशयावरुन झडती घेतली असता त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपयांचा एम.डी. नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. या सर्वांना अटक करून तपास करत असताना आणखीन ४ आरोपी असल्याचे निदर्शनास आले. या आरोपींकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांना सुध्दा अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असताना पोलिसांना पाहिजे असलेला आरोपीच्या शोधात पोलीस पथक राजस्थान राज्यातील झुनझुनु गावात पोहोचले असता तेथे एमडी नावाचा अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उघडकीस आला.
पोलिसांनी सुमारे १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी बनविण्याची आवश्यक ती साधनसामुग्री (पलास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा १०० कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन कारखाना चालविणारा अनिल विजयपाल सिहाग याला अटक केली. सदरची कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या पथकाने केली.