‘खासदार फुटणार' या खोट्या बातम्यांचे  ‘शिवसेना'चेच (उबाठा) नेते सूत्रधार

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका

ठाणे : निवडणुकांमध्ये एकामागून एक झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचे अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरुन लक्ष हटवण्यासाठी ‘शिवसेना' (उबाठा) नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर, अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना (उबाठा) खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचे वृत्त खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये फेटाळून लावले.

शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. दिल्ली मध्ये महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केले तर पक्ष फुटणार, असे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाठा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि  संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला.

शिवसेना (उबाठा) नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ‘उबाठा'ने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षात नाराजी असल्याने लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या ‘उबाठा'चे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत,  असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला. ‘उबाठा'चा खासदारांवर विश्वास नसल्याने त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. संजय राऊत यांच्या कटकारस्थानामुळेच उबाठा पक्ष मृतावस्थेत गेला आहे, अशी खरमरीत टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुध्द सुरु आहे. आदित्य ठाकरे जर राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊत यांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उध्दव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे. खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच खोट्या बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहेत, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरिक्षा द्यावी लागत आहे, असा टोला खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘जनता दरबार' उपक्रम ठरतोय जनतेचा आधार