कामगार रुग्णालय रुग्णसेवेसाठी होतेय सज्ज
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील लाखो कामगारांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तब्बल १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले सुपर स्पेशलिटी कामगार रुग्णालयाच्या काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. रुग्णालयाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वप्न खरे होणार आहे.
उल्हासनगर कॅम्प-३ मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या बाजुला कामगार रुग्णालय आहे. या कामगार रुग्णालयातून डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूर येथील औद्योगिक क्षेत्र आणि लहान मोठ्या कारखान्यातील सुमारे ३ लाख कामगारांना १९७१ पासून आरोग्य सेवा पुरवली जात होती. २०१५ मध्ये या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल ‘मुंबई आयआयटी'कडून देण्यात आला. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोडकळीस आलेल्या, जर्जर झालेल्या धोकादायक इमारतीच्या जागी नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे रहावे यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत रुग्णालयासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला होता.
२०१९ मध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नवीन इमारत बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यरत असलेले कामगार रुग्णालय स्थलांतरीत करणे गरजेचे होते. परंतु, याकरिता ‘ईएसआयसी'कडून अनेकदा निविदा काढून सुध्दा प्रक्रियेस यश आले नाही. ‘ईएसआयसी'ने रुग्णालयाकरिता नवीन जागा निश्चित करीत ४ वर्षांपूर्वी पवई येथील शिवसदन इमारतीत स्थलांतरण केले. त्यानंतर तात्काळ जुनी इमारत पाडून ‘ईएसआयसी'ने नेमलेल्या ठेकेदारामार्फत कामगार रुग्णालयाच्या २ मजली इमारतीचे बांधकाम तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम सुरु झाले.
१०० बेडस्च्या या रुग्णालयाकरिता २ लाख चौरस फुटांचे २ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यातील अंदाजे १ लाखपेक्षा अधिक चौरस फुट क्षेत्र रुग्णालयाचे आहे. यासाठी ‘केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग'चे कार्यकारी अभियंता किशन अवतार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता रणजीत बोटे, प्रकल्प व्यवस्थापक संजीव गुप्ता, कनिष्ठ अभियंता रोहित कुमार, बांधकाम व्यवस्थापक समीर पाटील यांच्या टीमने ३ वर्षात रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आणले आहे.
विशेष म्हणजे इमारतीच्या बांधकामात गंजरोधक लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या तळमजला तथा परिसरात आपत्कालीन विभाग, ओपीडी, स्वागत कक्ष, औषध दुकान, जनरेटर रुम, इलेक्ट्रिक रम, शवविच्छेदन केंद्र, मलप्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण होत आले आहे. पहिल्या मजल्यावर सुसज्ज असे ३ ऑपरेशन थिएटर, डॉक्टर ओपीडी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षा कक्ष उभारण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर रुग्णांचे विविध वॉर्डस् आहेत. दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ५ लिपट आहेत. या लिपटचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आहे.
या कामगार रुग्णालयात विविध वॉर्डस् मध्ये मिळून ११५ बेडस् असणार आहे. १० आयसीयू, ९६ सर्वसाधारण, ६ आपत्कालीन बेडस् असतील. रुग्णालयात संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा लावण्यात आली आहे. फिजियोथेरेपी, आपत्कालीन ट्राम वॉर्ड, रेडिओलॉजी विभाग, आयसीयू, एनआयसीयू, अल्ट्रासाऊंड, आदि सुविधांनी सुसज्ज आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय...
रुग्णालयात कार्यरत पूर्णवेळ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. टाईप-३ मध्ये १६ सदनिका विकसित करण्यात आल्या आहेत. या सदनिका वर्ग-३ कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. तर टाईप-४ मध्ये १४ सदनिका असून त्या वर्ग-२ च्या डॉक्टर्सना आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. २ सदनिका जिल्हा शल्य चिकित्सक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
रुग्णालय इमारतीत ग्रीन फीचर्स...
कामगार रुग्णालयाची इमारत पूर्णपणे सोलर विजेवर चालणार आहे. यासाठी इमारतीवर २५० किलो व्हॅटची सुसज्ज सोलर यंत्रणा बसविण्याचे काम चालू आहे. इमारतीमध्ये खिडकीच्या जाळीपसून शिडीच्या रेलिंग पर्यंत संपूर्णपणे स्टील रेलिंग बसविण्यात आली आहे. खिडकीला स्लाईडिंग खिडकीत डबल टफन ग्लास बसविण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालयाबाहेरुन एखादी मिरवणूक जात असेल तरी तिचाही आवाज आत येणार नाही. या इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. इमारतीच्या भोवताली असलेले वृक्ष इमारत उभारताना जतन करण्यात आलेले आहे. इमारतीच्या समोर हिरवळ दिसावी यासाठी गवताचा गालिचा असलेले गार्डन उभारले जात आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात जागा ठेवण्यात आली आहे.
१०० दिवसात काम पूर्ण...
उल्हासनगर मधील कामगार रुग्णालय एक अत्याधुनिक स्वास्थ्य केंद्र असणार आहे. याद्वारे परिसरातील लाखो लाभार्थी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आजारपणात तसेच अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या रुग्णालयाचा फायदा होणार आहे. येत्या १०० दिवसात रंगरंगोटी, स्वच्छता, शस्त्रक्रिया विभागाचे काम, फर्निचर, प्रतिक्षा कक्षात खुर्च्या बसविण्याचे काम युध्द पातळीवर पूर्ण करणार असल्याचा मानस ‘सीपीडब्ल्यूडी'च्या अभियंतांनी व्यक्त केला आहे.