‘नवी मुंबई'चा महापौर कोण?

उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांचे पारडे जड

नवी मुंबई : येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी १ फेब्रुवारी रोजी स्महापालिका सचिव संघरत्ना खिल्लारे यांच्याकडे भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत.

महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता ‘भाजपा'तर्फे सुजाता सुरज पाटील तर ‘शिवसेना'तर्फे सरोज रोहिदास पाटील यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे. तसेच उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता ‘भाजपा'तर्फे दशरथ भगत आणि ‘शिवसेना'कडून आकाश मढवी यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी खासदार डॉ. संजीव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक, सुधाकर सोनवणे, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह ‘भाजपा'चे नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तर ‘शिवसेना'च्या वतीने उपनेते विजय चौगुुले, संपर्कप्रमुख अंकुश कदम, जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील तसेच ‘शिवसेना'चे इतर पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबई महापालिका मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली असल्याने महापौर पदी सुजाता पाटील आणि उपमहापौर पदी दशरथ भगत यांची निवड निश्चित मानली जात आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या निवडणुकीत नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात ‘भाजपा'ला नेत्रदीपक यश मिळाले. महापालिकेत ‘भाजपा'चे एकूण ६५ उमेदवार जिंकून आले. भरत भोईर या अपक्ष नगरसेवकाने देखील ‘भाजपा'ला बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारे ‘भाजपा'चे संख्याबळ ६६ झाले असून महापालिकेत पूर्ण बहुमत आहे.६६ नगरसेवकांची गट नोंदणी ‘भाजपा'ने कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे. आता नवी मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ती उत्सुकता आता पूर्णत्वास गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ‘भाजपा'कडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर पदासाठी ‘भाजपा'तफे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सुजाता पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सुजाता पाटील यांनी कुकशेत गांव प्रभाग क्रमांक-२३ अ मधून विजय मिळवला आहे. त्यांची नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे. त्यांचे पती सुरज पाटील देखील नगरसेवक आहेत.

तर दुसरीकडे ‘भाजपा'तर्फे उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले दशरथ भगत अनुभवी नगरसेवक असून त्यांची नगरसेवक पदाची चौथी टर्म आहे. ते वाशी गांव प्रभाग क्रमांक-१८ क मधून जिंकले आहेत. त्यांनी यापूर्वी ‘काँग्रेस'च्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदही भूषविले आहे. 

दरम्यान, महापौर पदाच्या उमेदवार सुजाता पाटील आणि उपमहापौर पदाचे उमेदवार दशरथ भगत या दोघांनीही त्यांना देण्यात आलेल्या संधीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना. गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणार १ लाख कोटी - मुख्यमंत्री फडणवीस