प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
जपानी शिष्टमंडळाची अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणमधील शैक्षणिक संस्थांना भेट
अंबरनाथ : जपानमधील प्रसिध्द ओकायामा गाकुइन युनिव्हर्सिटीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकताच ठाणे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचा दौरा केला. युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष मिस्टर मसाशी यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन ‘भारत-जपान संयुक्त शैक्षणिक उपक्रम'बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या दौऱ्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जपानमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने अंबरनाथ मधील जोतिबा फुले नगर आणि बारवुÀपाडा येथील आश्रम शाळा, उल्हासनगरचे एस.एस.टी. कॉलेज, आर.के.टी. कॉलेज आणि कल्याण मधील टी. एम. अग्रवाल कॉलेजला भेट दिली. यावेळी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना जपानमधील उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि संयुक्त उपक्रमांच्या (जॉइंट व्हेंचर) संधींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळात ओकायामा गाकुइन युनिव्हर्सिटीच्या सीईओ सुश्री सचिको ओयामा, आंतरराष्ट्रीय विभागाच्या सुश्री नोझोमी होरिगुची, जपान-इंडिया इंडस्ट्री प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत गोडघाटे आणि वर्डेस्क स्ट्रॅटेजीचे संचालक नितीन साळवे यांचा समावेश होता.
मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आणि या उपक्रमाचे समन्वयक डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांनी या दौऱ्याचे महत्त्व विषद केले. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि शहाड परिसरातील जे उद्योजक जपानसोबत उद्योग, व्यापार, आयात-निर्यात किंवा संयुक्त भागीदारी करु इच्छितात, त्यांनी या उपक्रमाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. इंगळे यांनी केले आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्राला जागतिक स्तरावर जोडण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे.