प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ठाण्यात २३ व्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'ला सुरुवात
ठाणे : ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' यांच्या वतीने ठाणेतील दोस्ती वेस्ट काऊंटी येथे आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चे १७ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. १९ एप्रिल पर्यंत सुरू राहणाऱ्या या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये ४० हून अधिक प्रसिध्द बिल्डरांचे ‘महारेरा'ने मंजूर केलेले १०० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात नागरिकांना घराच्या नोंदणीवर आकर्षक ऑफर्ससह स्वप्नातील घर आणि व्यावसायिकांना वाणिज्य मालमत्तांची खरेदी करता येणार आहे.
यंदाच्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक संजय भोईर, ‘एसबीआय'चे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र धिंग्रा, क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे'चे अध्यक्ष सचिन मिराणी, राजू व्होरा, सचिव फैय्याज विराणी, ‘प्रॉपर्टी प्रदर्शन समिती'चे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा, ‘क्रेडाई- एमसीएचआय, ठाणे'चे युवा शाखा अध्यक्ष निमित मेहता, आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. नागरिकांना प्रदर्शनात मोफत प्रवेश असून, पार्किंग व्यवस्थाही मोफत उपलब्ध करण्यात आली आहे.
‘प्रॉपर्टी प्रदर्शन'द्वारे पुढील २ ते ३ वर्षांच्या ठाणे शहरातील विकासाची दिशा दिसून येते. शहराच्या विकासात ‘क्रेडाई-एमसीएचआय'चे योगदान महत्वाचे असून, महापालिका आणि एमसीएचआय यांच्यात समन्वय साधण्यासाठी ३ ते ४ महिन्यांमध्ये बैठक घ्यावी, असे आवाहन आमदार डावखरे यांनी केले.
ठाणे शहराच्या विकासासाठी सातत्याने महापालिकेकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यासाठी ‘एमसीएचआय'ने योगदान द्यावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.
ठाणे शहराच्या विकासाचे प्रतिबिंब ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये उमटले आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्यात मेट्रो, कोस्टल रोड, ठाणे-बोरिवली बोगदा, अंतर्गत मेट्रो आदि प्रकल्पांमुळे मोठा विकास होत आहे. ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'ने विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत ठाण्यात घर आणि व्यावसायिक जागा खरेदी केलेल्या नागरिकांना फायदा झाला आहे. यंदाच्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये एकाच छताखाली घर, व्यापारी जागा आणि गृह कर्जाचे पर्याय उपलब्ध आहेत, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली. तसेच जुन्या ठाणे शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ९ मीटर रुंद रस्त्याच्या नियमात सुधारणा करावी, असे आवाहन सचिन मिराणी यांनी केले.
ठाणेकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये गृह प्रकल्प साकारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात रेरा मान्यताप्राप्त दर्जेदार आणि उत्कृष्ट गृहसंकुलांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला सुमारे १ लाखांहून अधिक नागरिक भेट देतील, अशी अपेक्षा सचिव फैय्याज विराणी यांनी व्यक्त केली. ठाण्यातील विश्वासार्ह व नामांकित बिल्डरांबरोबर प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहक जोडले जातील. त्यांना स्वप्नातील घर सहजपणे उपलब्ध होईल, असा विश्वास प्रॉपर्टी प्रदर्शनाचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी व्यक्त केला.
यंदा ‘एमसीएचआय है तो भरोसा है' या टॅगलाईनने सुरु झालेल्या प्रदर्शनात शहरातील ४० हून अधिक नामांकित बिल्डर, नामांकित बँका आणि वित्तसंस्थांची दालने आहेत. सुमारे ५० लाखांपासून प्रीमियम वॉटरफ्रंट घरांपर्यंत विविध घरांचे पर्याय आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या रिटेल जागांचा समावेश आहे. या प्रदर्शनात ऑन द स्पॉट कर्जेही मंजूर केली जात आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार घरांचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.