ई-ऑफिस कार्यप्रणाली हाताळण्यात अनेक अडचणी?
वाशी : नवी मुंबई महापालिकेची कार्यप्रणाली पूर्णतः डिजीटल व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी गतीमान पावले उचलली असून ‘ई-ऑफिस' कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, सदर ‘ई-ऑफिस' प्रणाली हाताळण्यात काही महापालिका कर्मचारी अजूनही सक्षम झाले नसल्याने अनेक संचिका पूर्ण होण्यास दिरंगाई होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे.
‘ई-ऑफिस' कार्यप्रणालीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजात अधिक गतीमानता आणि पारदर्शकता येणार असून, त्यामुळे नागरिकांना विहीत वेळेत दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला अधिक सुनियोजितपणा येईल, असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नवी मुंबई महापालिकेने ई-ऑफिस कार्यप्रणाली सुरु केली आहे. मात्र, आजही काही महापालिका विभागात ‘ई-ऑफिस' कार्यप्रणाली हाताळण्यात अडचणी येत आहेत.काही महापालिका विभागात स्कॅनरची कमतरता तर काही ठिकाणी प्रशिक्षणाचा अभाव असल्याने ‘ई-ऑफिस' कार्यप्रणाली हाताळणी करताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.त्यामुळे अनेक संचिका पूर्ण करण्यास दिरंगाई होत आहे, अशी चर्चा दबवया आवाजात महापालिका मधील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
‘ई-ऑफिस' कार्यप्रणाली चालवण्याबाबत महापालिका मधील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ‘ई-ऑफिस' कार्यप्रणालीत काही दोष नाही. ‘ई-ऑफिस' कार्यप्रणाली हाताळण्यात कोणाला अजूनही अडचणी येत असतील तर त्याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - शरद पवार, उपायुक्त (प्रशासन) - नवी मुंबई महापालिका.