२२, २३ नोव्हेंबर रोजी खारघरमध्ये ‘रोलिंग लाऊड'चे आयोजन

नवी मुंबई : खारघर, सेक्टर-२८ आणि ३१ मधील कॉर्पोरेट पार्क येथे २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी ‘रोलिंग लाऊड' या भारतातील पहिल्या वाहिल्या हिप-हॉप फेस्टीव्हल अंतर्गत मोठ्या म्युझिकल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ३५ ते ४० हजार प्रेक्षक आणि सुमारे ६ ते ७ हजार वाहने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारघर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई वाहतूक विभागाने खारघरमधील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना लागू केली आहे.  

या अधिसुचनेनुसार बीडी सोमानी चौक ते प्रशांत कॉर्नर या रस्त्याच्या दोन्ही लेनवर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणारी पार्किंग वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नागारिकांना विनायक शंकर राठोड - पापडीचा पाडा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे उत्सव चौक -ग्रामविकास भवन -गुरुद्वारा -ओवेगाव चौक -हिरानंदानी ब्रिज जंक्शन पापडीचा पाडा -प्रशांत कॉर्नर -बीडी सोमानी चौक -जे. कुमार सर्कल -गुरुद्वारा चौक ग्रीन हेरिटेज -जे. कुमार सर्कल या मार्गांवर वाहन उभे केल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.  

त्यामुळे या मार्गावरील दोन्ही लेनवर नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२वाजेपर्यंत सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना लागू राहणार आहे. त्यामुळे खारघरमध्ये सुरळीत वाहतूक ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेत जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण