सिडको प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

५६ वर्षांचा वनवास संपणार कधी?

नवी मुंबई : ‘सिडको'च्या स्थापनेला ५६ वर्षे उलटली, तरी आपल्याच जमिनीवर विस्थापित झालेल्या भूमीपुत्रांचा अन्यायाविरुध्दचा लढा आजही धगधगत आहे. ‘सिडको'च्या वर्धापन दिनाचा उत्सव सुरु असतानाच, दुसरीकडे आपल्या न्याय्य हक्कांसाठी सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांनी १७ मार्च रोजी सिडको भवनसमोर जोरदार ठिय्या आंदोलन केले. प्रकल्पग्रस्तांची एक पिढी संपली, आता दुसरी पिढी रस्त्यावर उतरली आहे; पण प्रशासन अद्याप ढिम्मच आहे, असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी केला.

पिढ्या बदलल्या; पण प्रश्न तेच! ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनेक सनदी अधिकारी आले आणि गेले. प्रत्येकाने आश्वासनांची खैरात केली; मात्र भूमीपुत्रांच्या पदरात आजही उपेक्षाच पडली आहे. नवी मुंबईच्या उभारणीसाठी स्वतःच्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप आणि गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रश्न गेली ५६ वर्षे प्रलंबित आहे. आपल्या हक्कासाठी लढता लढता प्रकल्पग्रस्तांची एक अख्खी पिढी काळाच्या पडद्याआड गेली. आता त्यांच्या मुला-नातवांनाही त्याच मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे, हीच मोठी शोकांतिका आहे.

यावेळी सिडको हटाव, भूमीपुत्र बचाव असा नारा देण्यात आला. ठिय्या आंदोलन ‘एमआयडीसी आणि सिडको प्रकल्पग्रस्त कृती समिती'चे अध्यक्ष मनोहर पाटील, नारायण पाटील, प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, रमाकांत पाटील, नामदेव डाऊरकर, निलेश पाटील, रंजना पाटील,  ‘९५ गांव-नयना प्रकल्पग्रस्त समिती'चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

आंदोलनातील प्रमुख मागण्याः

साडेबारा टक्के भूखंडांचे प्रलंबित वाटप तात्काळ पूर्ण करा. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे कोणताही दंड न आकारता नियमित करा. भूमीपुत्रांना सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पांमध्ये रोजगारात १०० टक्के प्राधान्य द्या. गांवठाणांच्या सीमा निश्चित करुन ‘एफएसआय'चा प्रश्न मार्गी लावा, आदि मागण्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने यावेळी करण्यात आल्या.  

दरम्यान, ‘सिडको'च्या वर्धापन दिनी झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. आता तरी सरकार आणि प्रशासन या भूमीपुत्रांच्या आक्रोशाची दखल घेणार का की पुन्हा एकदा आश्वासनांची बोळवण होणार? याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

आम्ही जमिनी दिल्या म्हणून आज नवी मुंबई दिमाखात उभी आहे. पण, ज्यांचे बलिदान दिले, त्यांनाच आजही भिकेला लावण्याचे काम सिडको प्रशासन करत आहे. जोपर्यंत आमचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत सदर लढा थांबणार नाही.
- मनोहर पाटील, अध्यक्ष-एमआयडीसी-सिडको प्रकल्पग्रस्त कृती समिती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश