प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
सत्ताधाऱ्यांंमध्ये नवी मुंबईत भ्रष्टाचाराची स्पर्धा -‘ठाकरे युती'चा आरोप
नवी मुंबई : राज्यामध्ये सत्तेत सहभागी असतानाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे वनमंत्री गणेश नाईक यांना बकासुरसम्राट तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टेंडरसम्राट पुरस्कार शिवसेना आणि मनसेच्या वतीने जाहीर करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटींचा टेंडर घोटाळा केला असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे, तर नाईक यांनी अडवली-भुतावलीमध्ये ३५० एकरचा भूखंड हडप केल्याचा कांगावा ‘शिंदे गट'कडून सुरु आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या या दोन्ही मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही शिवसेना आणि मनसे तर्फे करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त २ दिवसांचा कालावधी उरलेला असताना नवी मुंबईत ना. गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. दोन्ही नेते सत्तेत सहभागी असताना एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. त्यामुळे ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युती'च्या वतीने दोन्ही नेत्यांना सदर पुरस्कर जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा १२ जानेवारी रोजी तुर्भे येथील योगी हॉटेलमध्ये आयोजित ‘पत्रकार परिषद'मध्ये करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, मनसे सचिव विलास घोणे, आदि उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांमध्ये नवी मुंबईत भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांनी बकासुरसम्राट आणि टेंडरसम्राट या पुरस्काराची घोषणा केली आहे, असे गजानन काळे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे ‘भाजपा'चे वाशीमधील उमेदवार अवधूत मोरे यांनी मच्छी मार्केटमुळे येथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा जोरदार फटका या निवडणुकीत ‘भाजपा'ला बसणार आहे, असे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.
महापालिका शाळांमध्ये हिंदी सक्तीची...
महापालिका निवडणुकीसाठी ‘भाजपा'ने तयार केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात थापेबाजी करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये मराठीसह हिंदी भाषाही सक्तीची करण्यात येणार असल्याचे ‘भाजपा'ने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. नवी मुंबई महापालिकेत हजारो कंत्राटी कामगार काम करीत आहेत. कायम होण्यासाठी या कामगारांचा मोठा संघर्ष सुरु असून या कामगारांना कायम केल्याची थाप जाहीरनाम्यात मारली आहे. भूमीपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे अद्याप नियमित झालेली नाहीत. मात्र, ‘भाजपा'ने ही घरे नियमित केली असल्याचे बिनधास्तपणे सांगून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली आहे, असे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांनी प्रसिध्द केलेला जाहीरनामा म्हणजे कॉपी पेस्ट असून या ‘जाहीरनामा'मध्ये दिलेल्या गोष्टी ‘शिवसेना-भाजपा युती'च्या ‘वचननामा'मधून चोरलेल्या असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.