विवाहपूर्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त दाम्पत्याची धान्य, वह्यांनी तुला
नवी मुंबई : ‘नवी मुंबई स्टुडन्ट अँड युथ फाऊंडेशन'च्या वतीने वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे सानपाडा गांवचे ज्येष्ठ ग्रामस्थ पांडुरंग सिताराम पाटील आणि सौ. पार्वती पांडुरंग पाटील या दाम्पत्याचा विवाहपूर्तीच्या ‘हिरक महोत्सवी दिन' साजरा करण्यात आला.
या प्रेरणादायी संदेश देणाऱ्या सोहळ्यात राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनी या ज्येष्ठ उभयताचा अभिष्टचिंतनपर सत्कार केला. याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. अविनाश कुलकर्णी, हभप गुरुवर्य निलेश महाराज कुलकर्णी, युवा नेते निशांत भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, सुनंदा पाटील, समाजसेवक विजय वाळुंज, आयोजक हर्षित भगत, आदि उपस्थित होते.
सोहळ्यात आयोजकांच्या वतीने पांडुरंग पाटील आणि सौ. पार्वती पाटील यांची धान्याने आणि शालेय वह्यांनी तुला करण्यात आली. तुला केलेले धान्य वाशीतील आरोग्यदूत म्हणून कार्य करणाऱ्या कचरावेचक भगिनींना तर वह्या त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोज महाराणा यांनी तर सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.