तळोजा औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा संकलन- व्यवस्थापन व्यवस्था भक्कम

पनवेल : ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल' या उद्देशाने पनवेल महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महापालिका क्षेत्रातील चारही प्रभाग आणि औद्योगिक वसाहतींमधील घनकचरा व्यवस्थापनावरती विशेष लक्ष दिले आहे.यामध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीमधील घनकचरा संकलन, वाहतूक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिका मार्फत काटेकोरपणे पार पाडली जात असून, या कार्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या मे. ए. जी. इनविरो इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंत्राटदारामार्फत नियमित सेवा पुरविली जात आहे.

महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सरासरी ५०० टन कचऱ्यापैकी सुमारे २० ते २५ टन कचरा तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातून जमा केला जातो. महिन्याला जवळपास ७०० टन कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक केली जाते. संकलित कचऱ्याची प्रक्रिया सिडको घनकचरा प्रक्रिया केंद्रात केली जात असून, या प्रक्रियेसाठीचा खर्च महापालिका मार्फत सिडको प्राधिकरणास अदा केला जातो.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ५ टक्के कचरा तळोजा एमआयडीसीमधून निर्माण होत असून, या कचऱ्याच्या संकलन आणि प्रक्रिया व्यवस्थापनासाठी महापालिकेला वार्षिक सुमारे २.६८ कोटी रुपये इतका खर्च होत आहे. तथापि, तळोजा औद्योगिक क्षेत्रातून मिळणारे घनकचरा उपयोगकर्ता शुल्क अत्यल्प असून, या माध्यमातून केवळ २९.७५ लाख रुपये इतका महसूल प्राप्त होतो.

तळोजा औद्योगिक वसाहत क्षेत्रातील एकूण ९५० औद्योगिक कंपन्यांपैकी ३५८ कंपन्यांमध्ये नियमित घनकचरा निर्माण होतो. या कंपन्यांकडून रोज कचरा उचलण्यासाठी १ एलआरसी आणि २ एमआरसी वाहनांसह १२ इतके मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात आली असून, त्यामुळे कामावर सतत देखरेख ठेवली जाते.

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्हॉटस अप नियंत्रण गट तयार करण्यात आला आहे. संबंधित औद्योगिक संस्थांकडून मिळालेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात येत असून, वेळेत काम न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई लागू केली जात आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी दिली.

तळोजा एमआयडीसी परिसरातील रासायनिक कचरा घातक कचरा या श्रेणीत येत असल्याने त्याची विल्हेवाट तळोजा ‘एमआयडीसी'च्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत नियमानुसार केली जाते आणि महापालिका त्यात हस्तक्षेप करत नाही. महापालिकेने नेहमीच  स्वच्छ, सुंदर शहर व्हावे यासाठी प्राधान्य दिले आहे. यासाठी नियमबध्द कचरा व्यवस्थापन प्रणाली महापालिका तर्फे आखण्यात आली असून, त्यानुसार तळोजा परिसराचीही नित्यनेमाने साफसफाई केली जात आहे, असे महापालिका उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘अटल करंडक एकांकिका स्पर्धा'ची महाअंतिम फेरी