सिलेंडरचा स्फोट, बंद घराला आग
नवीन पनवेल : नवीन पनवेल मध्ये रेल्वे स्टेशनच्या बाजुला असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीतील बंद घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. काही वेळातच आग सर्वत्र पसरली. पनवेल महापालिकेच्या अग्निशमन पथकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; अनेक दुचाकींचे नुकसान झाले.
११ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या बाजुला असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीतील बंद घराला आग लागली. सिलेंडरचा स्फोट होऊन सदरची आग लागली असल्याचे बोलले जात आहे. या आगीत झोपडपट्टी वरुन जाणारी हाय व्होल्टेजची एक चालू लाईन तुटून घरावर पडली. तर ‘महावितरण'ची लाईन तुटून पडल्याने घराला आग लागली असल्याचे काही जण सांगत आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग भडकली.
सदर आगीची माहिती मिळताव महापालिकेच्या नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनी विद्युत लाईन बंद केली. सदर आगीमध्ये घराच्या मागच्या बाजुला असलेल्या दुचाकी पार्किंग मधील जवळपास १० ते १२ वाहनांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने काही तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. दोन जेसीबीच्या सहाय्याने विझवलेले साहित्य बाजुला करण्यात आले. मात्र, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नवीन पनवेल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.