काखेत कळसा आणि गावाला वळसा!  

नवी मुंबई : १२ वर्षीय गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या मुकेश खगेंद्र नेपाळी उर्फ समीर उर्फ सलीम (२०) या आरोपीची कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे पोलिसांनी एका स्केचद्वारे त्याचा शोध सुरु केला होता. मात्र, पोलिसांना सदर आरोपी वाशी पोलीस ठाण्यातील कोठडीतच सापडला आहे. कोपरखैरणे मध्ये दाखल एका विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला वाशी पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. याच कालावधीत वाशी पोलीस त्याचा बाहेर सर्वत्र शोध घेत होते. कोपरखैरणे पोलिसांनी सदर स्केच मधील आरोपी त्यांच्याच पोलीस कोठडीत असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

डायघर परिसरातील गतीमंद असलेली १२ वर्षीय पिडीत मुलगी २३ जानेवारी रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती वाशी रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचली होती. त्यावेळी एकटीच असलेली सदर मुलगी आरोपी मुकेश नेपाळी आणि त्याच्यासोबत असलेल्या तृतीयपंथीयाच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तिला वाशी रेल्वे स्टेशन लगतच्या झुडूपात नेले होते. त्यानंतर मुकेश नेपाळी याने पिडीत मुलीसोबत लैंगिक आणि अश्लिल चाळे करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तर तृतीयपंथीयाने तिला मारहाण केली होती. त्यानंतर दोघेही फरार झाले होते. त्यामुळे पिडीत मुलगी रडत घणसोली रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर ती वाशी रेल्वे पोलिसांच्या हाती लागली होती.  

त्यावेळी पिडीत मुलीला काहीच सांगता न आल्याने रेल्वे पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा वाशी पोलिसांकडे पुढील तपासासाठी पाठवून दिला होता. त्यानंतर वाशी पोलिसांनी पिडीत मुलीचे समुपदेशन करुन तिला विश्वासात घेऊन तिला बोलते केले असता, तिच्यावर सलीम नावाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचे तसेच त्याच्यासोबत असलेल्या तृतीयपंथीयाने तिला मारहाण केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.  

या गुन्ह्यातील आरोपीच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांकडे काहीच माहिती नसल्याने त्यांनी पिडीत मुलीकडून आरोपींची माहिती घेतली आणि त्यांचे स्केच तयार करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यासाठी पोलिसांनी गत आठवड्यात त्यांचे स्केच आजुबाजुच्या पोलीस ठाण्यात पाठवून दिले होते. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी स्केच मधील आरोपी सलीमशी मिळत्या जुळत्या वर्णनाच्या आरोपीला विनयभंगाच्या गुह्यात अटक केल्याचे सांगून तो तुमच्याच पोलीस कोठडीत असल्याची माहिती वाशी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कोठडीत असलेल्या मुकेश खगेंद्र नेपाळीला पिडीत मुलीला दाखवल्यानंतर त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने ओळखले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुकेश खगेंद्र नेपाळी याला पिडीत मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला या आरोपीला २ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली होती. ५ मार्च रोजी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

इंस्टाग्रामवर अंमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारे चौघे तरुण अटकेत