प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी व ऑटोचे नवे भाडेदर जाहीर
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रिपेड टॅक्सी आणि प्रिपेड ऑटोरिक्षांचे नवे भाडेदर जाहीर करण्यात आले आहेत, यामुळे प्रवाशांना निश्चित आणि पारदर्शक दरांचा मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेलचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे दर निश्चित करण्यात आले आहेत.
प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी जाहीर केलेल्या नव्या भाडेदरा नुसार प्रिपेड टॅक्सी सेवेसाठी सुधारित मूलभूत भाडेदर 20.66 रुपये प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 6 किलो मीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह एकूण 155 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 किलो मीटरसाठी 207 रुपये, 8.1 ते 10 किलो मीटरसाठी 258 रुपये, तर 10.1 ते 12 किलो मीटरसाठी 310 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. तसेच 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 20 टक्के प्रोत्साहनासह 347 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
पुढील टप्प्यात 14.1 ते 16 किलो मीटरसाठी 397 रुपये, 16.1 ते 18 किलो मीटरसाठी 446 रुपये, 18.1 ते 20 किलो मीटरसाठी 496 रुपये, तर 22 ते 24 किलोमीटर अंतरासाठी 595 रुपये भाडे राहणार आहे. त्याचप्रमाणे 24.1 ते 26 किलोमीटर अंतरासाठी 15 टक्के प्रोत्साहनासह 618 रुपये, तर 40.1 ते 42 किलो मीटरसाठी 998 रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर 42 किलो मीटरपेक्षा पुढील अंतरासाठी दर दोन किलो मीटरच्या स्लॅब नुसार भाडे आकारले जाणार आहे.
दरम्यान, प्रिपेड ऑटोरिक्षा सेवेसाठी सुधारित मूलभूत भाडेदर 17.14 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 6 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 टक्के प्रोत्साहनासह 129 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 6.1 ते 8 किलो मीटरसाठी 171, 8.1 ते 10 किलो मीटरसाठी 214 रुपये, तर 10.1 ते 12 किलो मीटरसाठी 257 रुपये भाडे राहणार आहे. 12.1 ते 14 किलोमीटर अंतरासाठी 20 टक्के प्रोत्साहनासह 288 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.
याशिवाय 24 ते 26 किलोमीटर अंतरासाठी 15 टक्के प्रोत्साहनासह 512 रुपये, तर 40.1 ते 42 किलोमीटर अंतरासाठी 828 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 42 किलो मीटरनंतरच्या प्रवासासाठीही दोन किलोमीटरच्या स्लॅबनुसार भाडे निश्चित करण्यात आले आहे.
शासनाच्या धोरणानुसार विमानतळ, रेल्वे स्थानके व बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकृत रिक्षा व टॅक्सी थांबे असणे आवश्यक आहे. या नव्या भाडेदरांमुळे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फसवणुकीपासून संरक्षण मिळेल तसेच सुरक्षित, सुकर आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळेल, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांनी सांगितले.