पनवेलकरांसाठी लवकरच ५५ मीटर, २८ मीटर अत्याधुनिक एरियल लॅडर

पनवेल : पनवेल शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत असून लोकसंख्या, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले, मॉल्स, रुग्णालये, हॉटेल्स तसेच उद्योगक्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच उंच इमारती, हाई-राईज रेसिडेन्शियल टॉवर्स, कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सदर गरज लक्षात घेऊन आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने ५५ मीटर आणि २८ मीटर उंचीपर्यंत कार्यक्षम अशा अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सद्यस्थितीत पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री मर्यादित असून, विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना वाचवायचे असल्यास आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचण्याकरिता आधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. ५५ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म उंच इमारतींमध्ये (१५ ते २० मजले आणि त्यापेक्षा जास्त) पोहोचण्यासाठी उपयोगी ठरेल, तर २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म मध्यम उंचीच्या इमारती, गृहनिर्माण संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्स आदि ठिकाणी बचावकार्यासाठी उपयुक्त ठरेल.

या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्ये, सुरक्षितता मानके, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन देखभाल खर्च यांची सखोल तपासणी करुन योग्य तो प्रस्ताव निवडण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे २२ कोटींहून अधिक खर्च (जीएसटीसह) येणार असून, सदर गुंतवणूक शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या माध्यमातून पनवेल महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि सुसज्ज होणार आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल. तसेच भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि उंच इमारतींशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज राहील.

नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे संरक्षण हीच महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी असून, त्या दृष्टीने पनवेल महापालिका सातत्याने आधुनिक सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ५५ मीटर आणि २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची खरेदी त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देशातील पहिला आयकॉनिक इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईत उभारण्याच्या प्रक्रियेला सिडकोची सुरुवात