महिला पालकांना शाळेने दिले स्वच्छतेचे वाण

कल्याण : रेल चाईल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर प्राथमिक शाळा डोंबिवली (पश्चिम) येथे मुख्याध्यापक अजय कुमार जोगी यांच्या संकल्पनेतून वसंत पंचमी निमित्त स्वच्छतेचे वाण या उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे उपस्थित होते. तसेच शाळा समिती सदस्य नितीन मांडे, केंद्र शाळा प्रमुख उदयभान गुप्ता उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत रामदास कोकरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांसह सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली. आठवड्यातून २ तास श्रमदान करुन स्वच्छतेच्या संकल्पनेला साकार करण्याचे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले.

शाळेतील स्वच्छतादूत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमांतर्गत ज्या पालकांनी शाळा स्वच्छ करण्यासाठी आपले योगदान दिले, त्या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपायुवत कोकरे यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेची त्रिसूत्री विद्यार्थी आणि पालकांना सांगून स्वच्छ-सुंदर शहरासाठी विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. कोरोना काळामध्ये मुख्याध्यापक अजय कुमार जोगी यांच्या नेतृत्वात पथनाट्य सादर करुन कल्याण मधील डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरूपी बंद केले याची आठवण कोकरे यांनी त्यांच्या भाषणातून करून दिली.

स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी महिला पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांनी तयार केलेले स्वच्छते संबंधित पोस्टर्स आणि चित्रे दर्शनी भागात लावण्यात आले होते. छोट्या बाल वैज्ञानिकांनी तयार केलेले घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वयंचलित कचराकुंडीचे प्रात्यक्षिक सर्वेज्ञ पेडणेकर आणि वैभव चौधरी या विद्यार्थ्यांनी उपायुक्त कोकरे यांना दाखवले. या आगळ्या-वेगळ्या तिळगुळ समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छतेचे वाण सर्व पालकांना देण्यात आले. महिला पालकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता कुलकर्णी यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावणे एमआयडीसीत आगीत 8 कंपन्या जळुन खाक