प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ग्रीन सिटी रोडवर सांडपाण्याचा गंभीर प्रश्न
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागातील ग्रीन सिटी रोड परिसरात सांडपाण्याच्या समस्येने रौद्ररुप धारण केले असून, यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. आठवड्यातून किमान दोनदा चेंबरचे दुषित पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत असल्याने या भागातील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणेही मुश्किल झाले आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, दर सोमवारी याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो. सांडपाणी रस्त्यावर वाहत असतानाच नागरिकांना, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना, अक्षरशः या दुषित पाण्यातून वाट काढत बाजारात खरेदी करावी लागत आहे. यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भिती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर प्रकार तात्पुरता नसून गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने घडत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करुनही संबंधित विभागाकडून यावर कोणताही ठोस उपाय किंवा कायमस्वरुपी तोडगा काढला जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे आणि चेंबर दुरुस्तीसह सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
यासंदर्भात नगरपालिका अधिकारी संतोष माने यांना विचारले असता ते म्हणाले की, या परिसरातील काही दुकानदाराने चेंबरवर सामान ठेवल्याने चेंबर झाकून गेलेले होते. मात्र, आम्ही तिथे साफसफाई करुन सांडपाण्याची समस्या दूर केली आहे.