सुरज पाटील यांची खासदार नरेश म्हस्के यांच्यावर टीका
नागरी सुविधांचे भूखंड विकण्याचे 'उद्योग' नवी मुंबईत केले
नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या 40 वर्षात नवी मुंबई शहराचा विकास एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. ज्या घटकांनी नवी मुंबईची लूट केली त्यांना उद्देशून त्यांनी नालायक हा शब्द वापरला असून तो कुणाला का झोम्बला? या शब्दांमध्ये माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.
खासदार म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबईच्या नेतृत्वावर केलेल्या बिनबुडाच्या टीकेचा खरपूस समाचार घेत शहराच्या लुटारूंना चोर म्हणणं उचित नाही का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
५ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक सुरज पाटील, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, अपर्णा गवते यांनी खासदार म्हस्के यांचे सर्व आरोप खोडून काढले.
कोरोना सारख्या संकटकाळात नवी मुंबईचा ऑक्सिजन, इंजेक्शन्स पळवले. एवढेच काय पण नवी मुंबईच्या हक्काचे पाणी पळवून येथील जनतेला तहानलेले ठेवलं. कराराप्रमाणे नवी मुंबईला एमआयडीसीच्या बारावी धरणातून 80 एमएलडी पाण्याचा पुरवठा व्हायला पाहिजे. परंतु, तो फक्त 40 एमएलडी होतो आहे. बारावीच्या धरणग्रस्तांना एका दिवसात नवी मुंबई महापालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी केले. आमच्या प्रकल्पग्रस्तांची मुलं गेली कित्येक वर्षे ठोक आणि कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार.
14 गावांच्या नवी मुंबईतील समावेशाबाबत बोलताना सुरज पाटील यांनी ही गावे नवी मुंबईवर लादली तर येथील सोयीसुविधांवर प्रचंड ताण येऊन येथील व्यवस्था कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त केली. खरंतर या गावांची नवी मुंबईशी संलग्नता नाही. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीशी संलग्नता आहे, त्या शहरांमध्ये या गावांचा समावेश का केला जात नाही? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. 2014 मध्ये या गावांच्या समावेशाबाबत पालिकेच्या सभागृहाने सशर्थ ठराव केला होता. भुयारी मार्ग बांधण्यासाठी 500 कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्याला कित्येक वर्ष उलटली असून आता या गावांमध्ये पायाभूत आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किमान 6600 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. अशा आशयाचे पत्र महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रशासक अभिजीत बांगर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवले होते, हे पत्र स्वयं स्पष्ट आहे असेही ते म्हणाले.
सर्वात स्वच्छ शहर, राहण्यायोग्य शहर, पाणीपुरवठा मध्ये स्वयंपूर्ण शहर, उत्तम नागरी आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच बाबतीत नवी मुंबई उजवी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची 14 गावे जबरदस्तीने जर नवी मुंबईमध्ये समाविष्ट केली तर भविष्यामध्ये नवी मुंबईकरांना सोयीसुविधा पुरवणे कठीण जाणार आहे. शहराचे मानांकन देखील घसरेल. हीच भूमिका आमच्या नेतृत्वाने मांडली आहे. त्यामध्ये चूक काय आहे. नवी मुंबईच्या लुटीचे निर्णय घेण्यात आले. प्रारूप विकास आराखड्यामध्ये नागरी सुविधांसाठी आरक्षित प्लॉट प्रारूप विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीच विकले. नव्हे तर त्यांना सीसी देखील द्यायला लावली. नवी मुंबईकरांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवले, असा आरोपही सुरज पाटील यांनी केला.
गणेश नाईक यांनी नवी मुंबई घडवली. याची आसुया आणि राग तुमच्या मध्ये आहे का आणि त्यामधूनच या शहराचं वाटोळे करणारे निर्णय घेण्यात आले का? असा खडा सवालही सुरज पाटील यांनी उपस्थित केला.
नवी मुंबईतील एका उपनेत्याने कोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्त, माथाडी बांधवांनी केलेल्या गरजेपोटीच्या बांधकामांवर आक्षेप घेतला आहे, त्याचा समाचार घेताना सुरज पाटील यांनी गरजेपोटीची बांधकामे नियमित झालीच पाहिजेत. त्यासाठी आमचे नेतृत्व प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रचार सभांमधून नवी मुंबईचा विकास फक्त आणि फक्त गणेश नाईक यांच्यामुळेच झाला असे बोलणारे खासदार म्हस्के आमच्या नेतृत्वावर आता टीका करत आहेत. त्यामुळे दूतोंडी कोण दुटप्पी कोण आहे, हे दिसून आले आहे. सुरज पाटील यांनी टीकाकारांना आव्हान देत नवी मुंबईचा विकास आणि त्या तुलनेत लगतच्या अन्य शहरांचा झालेला विकास यावर टीकाकार ज्या दिवशी ज्यावेळी ज्या ठिकाणी सांगतील आपण चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले.
नेत्रा शिर्के यांनी पुनर्विकासाच्या नावाखाली कुणाच्या तिजोऱ्या भरल्या याचा शोध घ्या असे नमूद करून स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या निर्णयांचे समर्थन होत असल्याचा आरोप केला. पुनर्विकासातून सर्वसामान्य जनतेचा फायदा व्हायला पाहिजे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. त्यामुळे स्वयं पुनर्विकास माध्यमातूनच पुनर्विकास व्हायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
आमच्या नेतृत्वावर जर यापुढे पातळी सोडून टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा नेत्रा शिर्के यांनी दिला.