सर्व एसटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी

परिवहन मंत्र्यांद्वारे तातडीने कार्यवाहीचे आदेश

नवी मुंबई : महिला सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)  तर्फे चालविण्यात येत असलेल्या सर्व एसटी बसेस मध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तर्फे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीवर राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश राज्य परिवहन विभाग प्रशासनाला दिले आहेत.

पुणे येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील तरुणी लैंगिक गैरप्रकारानंतर राज्य रस्ते परिवहन विभागाच्या सर्व एसटी आगारांमधील असुविधा प्रकर्षाने समोर आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधील गैरप्रकार टाळण्याबाबत परिवहन विभागाद्वारे उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरु केल्यास प्रवासावेळी आणि आगारात एसटी बस उभ्या असताना महिलांवर होणाऱ्या गैरप्रकारांना रोखता येईल, असे मत शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या लाल परीवरील लाडक्या बहिणींचा सुरक्षित प्रवासाचा विश्वास कायम रहावा, याकरिता महिला सुरक्षेसाठी एसटी आगारात आणि बस स्थानकात सुरक्षा रक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यासह पोलिसांची नियमित गस्त ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे, असे आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी सांगितले.

ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी बस भाड्यात ५० टक्के सवलत सरकारने दिली होती. त्यानंतर एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली. मात्र, महिलांची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. यासाठी राज्य परिवहन विभागाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी तत्परतेने परिवहन विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.  

राज्यात महिलांना असुरक्षित वाटणार नाही, असे वातावरण राज्यात हवे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी कटिबध्द आहते, असा दावा यावेळी डॉ. मनिषा कायंदे यांनी केला.  

याप्रसंगी ना. शंभुराजे देसाई, आमदार भावना गवळी, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मध्यवर्ती शासकीय रुग्णालय मधील अनागोंदी कारभार तात्काळ थांबवा