७८ वर्षाने वरसवाडी प्रकाशमान झाली!
शहापूरः देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटून गेली तरी शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत फुगाळे अंतर्गत येणाऱ्या वरसवाडीमध्ये वीज काही आली नव्हती. त्यामुळे घराघरात दिवा तेवत असल्याचे चित्र पहायला मिळते होते. अखेर गुरुवारी (१८ सप्टेंबर) रोजी श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालयाच्या प्रयत्नांमुळे सदर वस्तीमध्ये प्रथमच विद्युत पुरवठा सुरू झाला.
वीजपुरवठ्याच्या या महत्त्वपूर्ण घटनेमुळे वस्तीतील ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी या क्षणाचे स्वागत फटाके फोडून, जल्लोष करून केले. ”आज आमच्या गावाला पहिल्यांदाच वीज मिळाल्याने आम्हाला नवा उत्साह मिळाला आहे. अंधार दूर झाला असून आता आमच्या मुलांच्या शिक्षणासोबतच गावाच्या विकासाला गती मिळेल,” असे ग्रामस्थ रामा आघान यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले.
२०२० साली श्रमजीवी संघटनेने या वस्तीला प्रथमच भेट दिली होती. त्या वेळी वाडी अंधारात होती. वस्तीतील ग्रामस्थांना वीज नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मुलांना अभ्यास करता येत नव्हता, रात्री भीतीचे वातावरण निर्माण व्हायचे, शेती आणि इतर कामांसाठी वीजेचा वापर करता येत नव्हता. सदर परिस्थितीची गंभीर दखल घेत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालय येथे वारंवार पाठपुरावा सुरू केला. यामध्ये शहापूर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि आज, १८ सप्टेंबर २०२५ रोजी, वरसवाडी वस्तीला अखेर वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेत श्रमजीवी संघटनेचे मार्गदर्शक माननीय विवेक पंडित यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत वस्तीपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी सर्व अडथळे दूर केले.