प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई विमानतळावर तिसरी धावपट्टी
नवी मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई प्रवासी मागणीच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) येथे तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी ‘सिडको'ने राईटस् लि. आणि क्रिएटीव्ह ग्रुप एलएलपी (जॉईंट वेंचर) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सदर अभ्यास ६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
१५ एप्रिल रोजी ‘सिडको'ेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यासाबाबत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस ‘सिडको'च्या सीजीएम (टी ॲन्ड ए) गीता पिल्लई, अतिरिक्त मुख्य परिवहन अभियंता बिंदू मुरलीधरन, महाव्यवस्थापक-विमानतळ विभाग (राइटस् लि.) अनिल असवानी; तसेच क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी व्यवस्थापकीय संचालक गुरप्रीत सिंग शाह उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठीचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यासह दुहेरी विमानतळ प्रणालीचा भाग म्हणून कार्यरत झाले आहे. देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रमुख राष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून करण्यात आली असून, पूर्ण क्षमतेनंतर दरवर्षी ९०० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता यामध्ये विकसित केली जात आहे.
सुमारे ११६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या विमानतळात एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकतील अशा २ समांतर धावपट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील १० वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित होणारी ४ टर्मिनल्सही प्रस्तावित आहेत.
मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या २ कोटींहून अधिक असून, २०४० पर्यंत हवाई प्रवासी मागणी १५० एमपीपीए पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सदर मागणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (६० एमपीपीए क्षमता) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (९० एमपीपीए क्षमता) यांच्या संयुक्त क्षमतेतून पूर्ण केली जाणार आहे. मात्र, २०४७२०५० दरम्यान सदरची मागणी २४० एमपीपीए पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाढवण येथे तिसऱ्या विमानतळाचा प्रस्ताव असला तरी संभाव्य वाढत्या मागणीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ‘सिडको'कडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराच्या पर्यायांचाही सक्रियपणे अभ्यास केला जात आहे.
राईटस् लि. रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील नवरत्न आणि अनुसूची ‘अ' दर्जाची केंद्र सरकारी सार्वजनिक उपक्रम संस्था असून, वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील बहुआयामी सल्लागार म्हणून तिची ख्याती आहे. १९७४ मध्ये स्थापन झालेल्या राईटस्ला ग्रीनफिल्ड विमानतळ नियोजनाचा व्यापक अनुभव असून, स्थळ निवड, वाहतूक मागणी विश्लेषण, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन, तसेच विमानतळाच्या पायाभूत सुविधा आणि प्रणालींच्या आराखड्यांची निर्मिती यामध्ये विशेष प्राविण्य आहे.
दरम्यान, प्रस्तावित व्यवहार्यता अभ्यासामध्ये तिसऱ्या धावपट्टीच्या विकासाची तांत्रिक, कार्यकारी, पर्यावरणीय आणि आर्थिक व्यवहार्यता सर्वंकषपणे तपासली जाणार असून, यामुळे प्रदेशातील विमानवाहतूक पायाभूत सुविधा अधिक बळकट होऊन दीर्घकालीन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असे ‘सिडको'तर्फे स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना मुंबई महानगर प्रदेशाच्या दीर्घकालीन गरजा लक्षात घ्ोऊन जागतिक दर्जाचे विमानवाहतूक केंद्र म्हणून करण्यात आली आहे. आगामी दशकात हवाई वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित असल्याने भविष्योन्मुख नियोजन अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राईटस्-क्रिएटीव्ह ग्रुप यांची सल्लागार म्हणून नियुक्ती ‘सिडको'च्या दूरदृष्टीपूर्ण आणि भविष्याभिमुख पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे. प्रस्तावित तिसरी धावपट्टी क्षमता वाढ, कार्यक्षमता वृध्दी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी निर्णायक ठरेल. -विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.