प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा
विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका
नवी दिल्ली : शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये इराण-इस्त्राईल युध्द, देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. युध्दजन्य परिस्थितीत ‘एनडीऐ'चा मित्र पक्ष म्हणून ‘शिवसेना'चा पंतप्रधानांच्या भूमिकेला पाठिंबा आहे, आम्ही देशासोबत आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील विकास कामे आणि विविध प्रश्नांवर पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
आखाती देशांमधील युध्दजन्य परिस्थितीत भारतात खोटा प्रचार करुन राजकारण करणे अत्यंत दुर्देवी आणि देशविरोधी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. पाकिस्तानमध्ये हेडलाईन्स होण्यासाठी काहीजण बोलतात, असा टोला त्यांनी गांधी यांना लगावला.
शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांसाठी देश प्रथम आणि नंतर राजकारण असायचे. आज बाळासाहेबांचेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. युध्दामुळे कुवेत, दुबई, मस्कत या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पुन्हा येथे सुखरुप आणल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. कोव्हीडपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांसोबत निर्माण झालेल्या चांगल्या संबंधांमुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताची तेल वाहून नेणारी २ जहाजे सुखरुप मायदेशी आली, त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे या बैठकीत आभार मानले.
युध्दजन्य परिस्थितीचा विरोधक राजकारणासाठी वापर करत आहेत, ते दुर्देवी आहे. देशात गॅस टंचाई असल्याच्या अफवा काँग्रेस आणि उबाठा पसरवत आहेत. यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना संधी मिळतेय. राजकारणासाठी इतर विषय आहेत; मात्र युध्दजन्य परिस्थितीत देशासोबत राहणे अपेक्षित असताना विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ‘ऑपरेशन सिंदूर'वेळी देखील विरोधकांनी असेच राजकारण केले होते. काहीजण पाकिस्तानात हेडलाईन्स होण्यासाठी बोलतात, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गांधी यांच्यावर केली.
देशात गॅस टंचाईचा विषय आणि विरोधकांकडून होणारा खोटा प्रचार सभागृहात हाणून पाडण्याबाबत शिवसेना खासदारांना सडेतोड भूमिका घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात कुठेही गॅस सिलेंडरची टंचाई नाही. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्तकपणे काम करतेय. राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्या उच्चविद्याभूषित असून गरिबांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. मिलिंद देवरा, खा. धैर्यशील माने, खा. श्रीरंग बारणे आणि खा. रवींद्र वायकर उपस्थित होते.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक...
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही संसदेतील अध्यक्षांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, पियूष गोयल उपस्थित होते. तत्पूर्वी संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी संसद भवनात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री रिजीजू यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेतील कामगिरीचे कौतुक केले. श्रीकांत लहान भाऊ असून सभागृहात चांगले काम करतोय, असे रिजीजू म्हणाले.