महापालिकाच्या अत्यावश्यक सेवा व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून उपलब्ध
भिवंडीः नागरी सुविधा अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत भिवंडी महापालिकेने आता आपला ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट' सुरू केला आहे.या नवीन सुविधेद्वारे भिवंडीकर आता महापालिकेच्या कार्यालयात न जाता कधीही, कुठेही मोबाईल फोनद्वारे महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवांचा लाभ घेऊ शकतात.. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून आधुनिक, पारदर्शक कारभारात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सॲपवर ७०६६६ ४४८४४ या क्रमांकावर ‘हाय' पाठवावा लागणार आहे. यानंतर, भिवंडी महापालिकेचा अधिकृत चॅटबॉट सक्रिय होऊन आवश्यक पर्याय दर्शाविणार आहे. या सेवांमध्ये मालमत्ता कराचा भरणा समाविष्ट आहे. तसेच तक्रारी नोंदवणे, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सेवा आणि इतर अनेक सुविधा लवकरच जोडल्या जात आहेत. नागरिकांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक धावपळ यापासून वाचवणे हा या सेवेचा उद्देश असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आता प्रत्येकजण अत्यावश्यक सेवा सहज मिळवू शकतो. ही सुविधा विशेषतः वृद्ध, कष्टकरी आणि दुर्गम नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.