उरण बाजारपेठेत बहुगुणी औषधी पांढरा कांदा दाखल

उरण : उन्हाळी हंगामात रायगड जिल्ह्यातील अलिबाग मध्ये पिकणारा औषेधी गुणकारी पांढरा कांदा उरण तालुवयातील बाजारात विक्रीसाठी आला आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे.

मात्र, यावर्षी कांद्याच्या  एका  माळेसाठी २००  ते ३५० रुपये दर आकारला जात आहे. या वाढत्या दरामुळे नागरिकांनी पांढरा कांदा खरेदीत हात आखडता घेतला आहे. कांद्याच्या आकारानुसार दर आकारला जात आहे. वाढत्या उष्णतेवर पांढरा कांदा फायदेशीर असून, यंदा पांढरा कांदा चांगलाच भाव खात आहे. ३०० ते ३५० रुपयांना कांद्याच्या  माळेची विक्री होत आहे.

अलिबाग येथील पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे सफेद  कांदा राज्यभर आणि देशात प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे रायगडमध्ये येणारे पर्यटक मोकळ्या हाताने परत न जाता गुणकारी औषधी पांढरा कांदा जाताना घेऊन जात आहेत. अलिबाग-मुरुडमध्ये येणारे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अलिबाग-वडखळ मार्गाने मुंबई, पुणे शहराकडे निघताना सफेद कांद्याची माळ, कलिंगड, वालाच्या शेंगा, ताजी भाजी, औषधी कंदमुळे आवर्जून खरेदी करत आहे. यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी आहे.  अलिबाग तालुक्यातील तळवली, सागाव, मारुती, खंडाला, नेवली, कार्ला, मानीबुते आदि ठिकाणी सफेद कांद्याची लागवड केली  जाते. यंदा सफेद कांद्याची माळ १५० ते ३०० रुपये दराने विकतो, असे नवखार-रेवस येथील पांढरे कांदे विक्रेती सुजाता अशोक पाटील यांनी सांगितले.

अलिबाग  तालुक्यातील तळवली, सागाव, कृषी विभागाने पांढरा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला असून, यावर्षी सफेद कांदा लागवड क्षेत्र वाढले आहे. १५० ते १७५ रुपये माळ असा दर गेल्यावर्षी होता. यंदा दर वाढले आहेत. अलिबाग-वडखळ मार्गावर सध्या सफेद कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून, या कांद्याला वाढती मागाणी आहे.  ग्राहक भाव न करता कांदा विकत घेत आहेत. उरण मध्ये नाक्यावर मोठ्या प्रमाणात या कांद्याची विक्री केली जात आहे.

अलिबाग तालुवयातील पांढऱ्या कांद्यात व्हिटॅमिन अ, ब आणि क तसेच पोटॅशीयम, सोडियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन आदी पोषक तत्व तसेच अँटी इन्फेमेट्री आणि अँटी ऑक्सीडंट गुणधर्म आहेत. यामुळे पचनशक्ती वाढते. फायबर असल्याने बद्धकोष्ठता सुधारते. याशिवाय केस, हृदय आणि रक्तदाब यासाठीही सफेद कांदा उपयुक्त असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सफेद कांद्याला अधिकची मागणी आहे.

पांढऱ्या कांद्याची बाजारात आवक वाढल्यानंतर कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता विक्रेत्यांनी दिली आहे. मात्र, सद्या आवक कमी असल्याने पांढऱ्या कांद्याची दरवाढ झाली आहे.

दरवर्षी आम्ही सफेद कांदा खरेदी करीत असतो. गुणकारी,औषधी कांदा असल्याने   सफेद कांद्याला मागणीही जास्त असते, अशी प्रतिक्रिया उरण मधील गृहिणी वंदना संजय भोईर यांनी व्यक्त केली. 

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन

Read Next

बाजारात हापूस आंबा आवक वाढण्यास सुरुवात