३ हजार नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबईमध्ये महा स्वच्छता अभियान
नवी मुंबई : नवी मुंबई दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून नवी मुंबईतील अनेक क्षेत्रे वर्दळीची आहेत. या रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याप्रमाणेच विशेषत्वाने महामार्ग आणि दुर्लक्षित ठिकाणे यांची सखोल स्वच्छता करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत देशातील ३ शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महापालिका नेहमीच सतर्कतेने कार्यरत असते. याकामी नागरिकांचाही विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग असतो.
याच अनुषंगाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १०३ व्या जयंती दिनानिमित्त २ मार्च रोजी नवी मुंबई परिसरामध्ये ‘महा स्वच्छता अभियान'चे विशेष आयोजन करण्यात आले.
त्यानुसार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही स्वच्छता मोहिमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून ‘नमुमंपा'च्या आठही विभागांत रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहिमेचेे नियोजन करण्यात आले. स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या ३०५० हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करुन यशस्वीरित्या मोहीम राबवली. सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालेल्या या ‘महा स्वच्छता मोहीम'चे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, नेरुळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छता मोहीमेत ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान'चे श्रीसदस्य यांना अंतर्गत रस्त्यावरील क्षेत्र वाटप करुन देण्यात आले होते.
या मोहिमेत बेलापूर विभाग अंतर्गत १९३ श्रीसदस्यांनी ६ ठिकाणी ६४४ किलो, नेरुळ विभागात १३ ठिकाणी ८०१ श्रीसदस्यांनी ३११९ किलो, वाशी आणि तुर्भे विभागात ६०५ श्रीसदस्यांनी १८ ठिकाणी २६२९ किलो, कोपरखैरणे मध्ये ६९७ श्रीसदस्यांनी १२ ठिकाणी १६५३ किलो, घणसोली ते दिघा विभाग विभागात ७५३ श्रीसदस्यांनी २३ ठिकाणी २९४७.५० किलो अशाप्रकारे एकूण ३०४९ श्रीसदस्यांकडून १०,९९२ किलो कचरा एकत्रित करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ-१ उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि परिमंडळ-२ उपायुक्त संतोष वारुळे तसेच परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे आणि परिमंडळ-२ उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छताकर्मी यांनी सहभागी होत विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी केली.