अनधिकृत बांधकाम प्रकरणः ‘ठामपा'तर्फे ५० गुन्हे दाखल, २६४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसेच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण २६४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर ६६ बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात, जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरु आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा २७ सप्टेंबर रोजी आढावा घेतला. या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, विधी अधिकारी मकरंद काळे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता, आदि उपस्थित होते.
कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरु राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष रहावे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीने एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करुन अचूक माहिती नोंदवावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत, असेही त्यांनी म्हटले.
तसेच अनधिकृत बांधकामात घर घेऊ नये, असे आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत. नागरिकांनाही घर खरेदी करताना बांधकाम अधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करुन घ्यावी. अधिकृतपणे ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यात आले आहे. सदर क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करुन बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. सर मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत.
प्रभाग निहाय दाखल गुन्हे (जून ते सप्टेंबर २०२५पर्यंत):
नौपाडा-कोपरी-०१, दिवा-११, मुंब्रा-१३, कळवा-०४, उथळसर-०१, माजिवडा-मानपाडा-०५, वर्तकनगर-०८, लोकमान्य नगर-सावरकर नगर-०७, वागळे इस्टेट-००, एकूण-५०.