तळोजा मधील हौसिंग सोसायटी मध्ये आग; घरातील साहित्य जळून खाक

खारघर : तळोजा फेज-२ वसाहत मधील सुखसागर सोसायटी मधील एका बंद घराला लागलेल्या आगीत घर बेचिराख झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे समजते.

तळोजा सेक्टर-३६ मधील सुखसागर हौसिंग सोसायटी मध्ये दहाव्या मजल्यावर राहणारे भगवान मिरे आणि त्यांची पत्नी दोघेही १५ एप्रिल रोजी सकाळी कामावर गेले होते तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. भगवान मिरे यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर दप्तर ठेवून सोसायटी प्रागणात सायकल चालवित असताना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भगवान मिरे यांच्या घरातील खिडकीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे रस्त्यावरील नागरिकांच्या निदर्शनास येताच अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. अग्निशमन दल जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, भगवान मिरे यांच्या घरातील फ्रिज, टीव्ही आणि इतर सर्व मौल्यवान साहित्य जळून खाक झाले.परंतु, आग कशामुळे लागली, याची माहिती मिळू शकली नाही.

खारघर अग्निशमन केंद्र अधिकारी सौरभ पाटील यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

दरम्यान, कळंबोली आणि खारघर येथे अग्निशमन केंद्र आहे. तळोजा वसाहतीत आगीची घटना घडल्यावर अग्निशमन केंद्रात माहिती प्राप्त होते. अग्निशमन दल जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत ३० ते ४० मिनिटे लागतात. तळोजा वसाहतसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे, असे तळोजा वसाहत मधील सामाजिक कार्यकर्ते अशोक राठोड यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट