नवी मुंबई एअरपोर्ट आजपासून प्रवासी सेवेत  

नवी मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) २५ डिसेंबर पासून प्रवासी सेवेसाठी खुला होणार असून, ख्रिसमसच्या दिवशी पहिल्या प्रवाशांचे ऐतिहासिक स्वागत केले जाणार आहे. या विमानतळाच्या कार्यान्वयनामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.  

सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकासा एअर या विमानसेवांमार्फत देशातील १६ प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे. उद्‌घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४ हजार प्रवासी या विमानतळावरुन प्रवास करणार असून फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

‘सिडको'च्या दूरदृष्टीला आणि दशकानुदशकांच्या मेहनतीला अखेर ऐतिहासिक यश मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिल्याच दिवशी तब्बल ३० एअर ट्रफिक मूव्हमेंटस्‌ (एटीएमएस) होणार असून, नवी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशासाठी तो एक सुवर्णक्षण ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक विमानतळ पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभा राहिल्याचे त्यांनी सांगितले.  

नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील वाढता ताण कमी होण्यासोबतच नियोजित मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम अधिक सक्षम होणार आहे. विमानतळ कार्यान्वित झाल्याने नवी मुंबईकरांसह पुणे, ठाणे, पनवेल, रायगड आणि कोकणातील नागरिकांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. तसेच विमानतळ सुरु झाल्याने रोजगारनिर्मिती, पर्यटनवृध्दी तसेच औद्योगिक आणि व्यापारी गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून, भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण प्रापत होणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी सांगितले.  

या विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणखी एक वैशिष्टद्द असून महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो तसेच प्रस्तावित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे विमानतळाकडे विविध दिशांनी सहज पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (एमटीएचएल) सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे सदर कनेक्टिव्हिटी अधिक भक्कम होणार असल्याचेही सिंघल यांनी स्पष्ट केले.  

या भव्य विमानतळाचे उद्‌घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते. प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहणार असून, दररोज २३ नियोजित उड्डाणे सुरु राहतील. इंडिगोची ६ ई ४६०पलाईट बेंगळुरूहून सकाळी ८ वाजता नवी मुंबईत दाखल होणार आहे. तर इंडिगोची ६ई ८८२ पलाईट हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नमुंमपा'च्या घनकचरा व्यवस्थापनाला नवी मानांकित ओळख