प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या
भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली १० डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये ‘संसद भवन'च्या बाहेर ‘महाविकास आघाडी'मधील खासदारांच्या वतीने निदर्शन करण्यात आले.
या निदर्शन आंदोलनात ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह ‘मविआ'चे खासदार सहभागी झाले होते. यावेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा देत त्यासंबंधी हातात आपल्या मागणीचे फलक घेऊन खासदारांनी आंदोलन केले. मागील ११ वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत विमानतळाला ‘दिबां'चे नाव देणार नाही, तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरुच राहणार अशी प्रतिक्रिया खा. सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.