नेरुळ सेक्टर-२५ मधील पदपथावर अतिक्रमण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मार्फत नेरुळ सेक्टर-२५ मध्ये बनविण्यात आलेल्या फुटपाथवर एका बांधकाम व्यावसायिकाने अतिक्रमण करुन नागरिकांची चालण्याची जागा अडविल्याने सदर फुटपाथवरील अतिक्रमण हटवून नागरिकांना चालण्याचा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी आग्रोळी गाव मधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर गोरखनाथ पाटील यांनी नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नेरुळ सेवटर-२५ मधील भूखंड क्रमांक-३४-३५ या जागेशेजारी नागरिकांना चालण्यासाठी नवी मुंबई महापालिका मार्फत नाल्यावर फुटपाथची निर्मिती करण्यात आली असून, सदर फुटपाथवर एका बांधकाम विकासकाने त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवून नागरिकांच्या रहदारीची, चालण्यासाठीची जागा बंदिस्त करुन ठेवली आहे. सदर फुटपाथ शेजारी महापालिका मार्फत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अडचणींचा सामना करुन नागरिकांना जीव मुठीत घेऊन ना-ना अडथळयांतून चालण्यासाठी मार्ग शोधावा लागत आहे, असे सुधीर पाटील यांनी महापालिका बेलापूर विभाग सहाय्यक आयुवतांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
नेरुळ सेक्टर-२५ मधील फुटपाथवर बांधकाम विकासकाने ठेवलेले साहित्य लवकरात लवकर हटविण्याचे आदेश देऊन संबंधित बांधकाम विकासकावर रस्ता अडविल्याबाबत आणि अतिक्रमण केल्याबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमान्वये कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही महापालिका बेलापूर विभाग सहाय्यक आयुवतांना दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते सुधीर गोरखनाथ पाटील यांनी केली आहे.