प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
‘केडीएमसी'कडून १४ इमारती अतिधोकादायक घोषित
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेतील घोलपनगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १४ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे जीर्ण वास्तुंमुळे जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरकडून मानसिक छळ आणि दबाव असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वी ‘केडीएमसी'ने केलेल्या या कारवाईने रहिवाशांची झोप उडाली आहे. इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसांमुळे रहिवासी भयभित झाले आहेत. रहिवाशांचे म्हणणे आहे की, बिल्डर पुनर्विकास प्रक्रियेत धमकी देत आहे. रहिवाशांना संपूर्ण माहिती न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून भाजपा नगरसेवक दया गायकवाड, शिवसेना नगरसेवक गणेश कोट यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर गायकवाड यांनी कडक सूर अवलंबत बिल्डरला ताकीद दिली. पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही रहिवाशाच्या हक्कांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. बिल्डरच्या मनमानी आणि दबावाच्या राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असे दया गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरच्या मनमानी, दबावाला झुगारुन केडीएमसी आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून रहिवाशांच्या हिताचे रक्षण करु, असे आश्वासन यानिमित्ताने लोकप्रतिनिधींनी दिले आहे.