केडीएमसी आरोग्य विभागाचे कर्मचारी वेतनापासून

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागात 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत काम करणाऱ्या 100 हुन अधिक स्टाफ, नर्स, डॉक्टर यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असून या कर्मचाऱ्यांनी नियमित वेतन आणि मानधन वाढ देण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. 

केडीएमसीच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर होत नाही. गेल्या एक वर्षांपासून 3 ते 4 महिन्यांच्या अंतराने वेतन होते, ते पण एका महिन्याचे वेतन देण्यात येते. सद्यस्थितीत गेल्या 3 महिन्यांचे वेतन रखडले असून यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च करण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार तसेच तोंडी तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. गेल्या 3 वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देखील झालेली नाही. इतर जिल्ह्यात एचडब्ल्यूसी व एचबीटी कर्मचाऱ्यांना 15 टक्के वाढ देण्यात येत आहे.  त्याप्रमाणे केडीएमसीमध्ये 15 टक्के वाढ देण्यात यावी. 

इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो मात्र केडीएमसीमध्ये देण्यात येत नाही. करार करताना देखील लेटरविना काम करावे लागत असून विशिष्ट कालावधी उलटल्यानंतर बॉण्ड पेपर मागून त्यावर वेतन अथवा तारीख लिहिण्यास सांगत नाहीत. बॉण्ड पेपरवर तारीख व वेतन न लिहिल्याने मूळ पगार किती हे समजत नाही. या सर्व अडचणी या आरोग्य कर्मचाऱ्यांना भेडसावत असून केडीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. 

तर याबाबत केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्याशी संपर्क केला असता, शासनाकडून वेतन प्राप्त झाले नसून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण संथ गतीने,शहरातील श्वानांची दहशत कायम