प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
२७ कोटींचे १३ किलो एमडी जप्त
ठाणे : मध्य प्रदेशामधून मेफेड्रोन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील ५ जणांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बासू सय्यद, राम सिंग गुर्जर, कैलाश बलाई, मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सुरी यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २७ कोटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपये किंमतीचे १३.६२९ किलो एमडी जप्त केले.
मुंब्रा येथील बिलाल रुग्णालयाजवळ कोणीतरी एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून बासू सय्यद याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून २३ ग्रॅम एमडी जप्त केले. पोलिसांच्या चौकशीत त्याने कबूल केले की, सदर एमडी मध्य प्रदेशातील राम सिंग गुर्जर आणि कैलाश बलाई यांनी आणले होते. त्यानंतर पथकाने तपास करीत राम आणि कैलाश याला अटक केली. त्यांच्याकडून ७ कोटी ३० लाख ५६ हजार रुपयांचे ३.५१५ किलो एमडी जप्त केले. पोलिसांना यात मोठा रॅकेट असल्याचा संशय आला आणि पुढील तपासात मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सुरी देखील या टोळीचा भाग असल्याचे आढळले.
त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक (कायदा-सुव्यवस्था) राजू पटोरीकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) नितीन पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राम दळवी, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम शेगर, पोलीस कॉन्स्टेबल सागर महांगडे, नीलेश वरसे, नवनाथ तेलंगे, सचिन पाटील, वसीम तडवी, सागर सपकाळे, प्रवीण पाटील आणि नवनाथ थोरवे यांचा समावेश होता.
रतलाम जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन...
मनोहर आणि राजू मध्य प्रदेशात असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी रतलाम जिल्ह्यात सापळा रचत सिनेस्टाईल कोम्बिंग ऑपरेशन करुन या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १९ कोटी ९१ लाख २० हजार रुपयांचे ९.९५६ किलो एमडी जप्त केले. यानंतर कसून चौकशी केल्यानंतर सदर पाचही जण आंतरराज्यीय टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे आढळून आले.