प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अंबरनाथ डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील सर्वोदयनगर परिसरातील डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुमसत असलेल्या या कचऱ्याने १९ मार्च रोजी दुपारनंतर अचानक रौद्र रुप धारण केले. वाऱ्याच्या वेगामुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरत असून, याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.
उन्हाळ्याची चाहुल लागताच अंबरनाथ शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ‘एमआयडीसी'मधील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीनंतर आता शहराच्या विविध भागांत आगीचे सत्र सुरुच आहे. १८ मार्च रोजी चिंचपाडा-नालंदानगर परिसरातील एका घराला आग लागली, तर अंबरनाथ पूर्वेतील लक्ष्मीनगर येथील सोमेश्वर मंदिराजवळील विद्युत वितरण यंत्रणेने (डीपी) पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या आगीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी कचऱ्याला जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनगर येथील रहिवासी फालके यांनी सोमेश्वर मंदिराजवळील डीपीभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन भविष्यातील दुर्घटना टाळता येतील. तसेच कचरा व्यवस्थापन सुरळीत करुन उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाढते तापमान आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे अंबरनाथ शहरासमोर आगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील आगीवर नियंत्रण मिळवले जात असले तरी, कचऱ्यातून सतत निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदुषणात प्रचंड वाढ होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.