स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर आदिवासी पाड्याला मिळणार स्मशानभूमी
शहापूर : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर मुसळेपाडा या आदिवासी वस्तीला स्मशानभूमी मंजूर करण्यात आली असून, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोक वीर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. २४ सप्टेंबर रोजी मुसळेपाडा स्मशान भूमीचे भूमिपूजन करण्यात आल्याने आदिवासींचा मरणानंतर चितेपर्यंतचा मन पिळवटून टाकणारा प्रवास आता थांबणार आहे. विशेष म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये पहिल्यांदाच स्मशानभूमी मिळणार आहे.
शहापूर तालुक्यातील ८५ आदिवासी वाडी वस्तीत भारत देश स्वातंत्र्य होऊन ७८ वर्षे झाली तरी स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाला मरणानंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती अतिशय मन हेलावणारी आहे. परंतु या स्थितीत देखील ग्रुप ग्रामपंचायत धामणीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अशोक वीर यांनी अथक प्रयत्न करून ग्रुप ग्रामपंचायत धामणी अंतर्गत साधारण ५०० लोकवस्ती असलेल्या मुसळे पाड्यातील आदिवासींना दिलेला शब्द पाळला आणि स्मशानभूमी मंजूर केली. मुसळेपाडा येथील मंजूर स्मशानभूमीच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत धामणी सरपंच सुगंधा अशोक वीर, माजी सरपंच विद्यमान सदस्य अशोक वीर, सदस्य भारत मांजे, मनीष राऊत, भाऊसाहेब गोवर्धने, सामाजिक कार्यकर्ते अक्षय भोईर, समाधान सांडे आदी उपस्थित होते.