आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी

पनवेल : आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत पनेवल महापालिकेला राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आयुष्मान डिजीटल भारत मिशन (एबीडीएम) भारताच्या आरोग्य क्षेत्रात डिजीटल परिवर्तनाची सुरुवात आहे. या उपक्रमामुळे आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिक केंद्रित होणार आहे. ‘एबीडीएम'मध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गर्शनाखाली पनवेल महापालिकेने विहित वेळेत सर्वप्रथम १०० टक्के नोंदणी केल्याबद्दल महापालिकेचा सन्मान करण्यात आला.

केंद्र सरकारने आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी झेप घेत आयुष्मान भारत डिजीटल मिशन सुरु केले असून, यामार्फत प्रत्येक नागरिकाला एक अद्वितीय आभा आयडी (आरोग्य ओळख क्रमांक) दिला जात आहे. या योजनेचा उद्देश देशभरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती एकत्र करुन तिला डिजीटल स्वरुपात सुरक्षितपणे साठवणे आहे.

आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत तयार केलेली आभा आयडी १४ अंकी युनिक ओळख क्रमांक आहे. या आयडीद्वारे नागरिक त्यांचे वैयक्तिक आरोग्य नोंदी एका क्लिकवर पाहू शकतात. यामुळे कागदपत्रे बाळगण्याची गरज राहत नाही आणि कोणत्याही रुग्णालयात पुन्हा तपासण्या करण्याची आवश्यकता कमी होते.

सदर मिशन अंतर्गत पनवेल महापालिकेने सरकारी आणि खासगी रुग्णालयांची नोंदणी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांची अधिकृत माहिती अशा महत्त्वपूर्ण नोंदणीचे काम उपायुक्त डॉ. वैभव विधाते आणि मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सूचनेप्रमाणे वैद्यकिय आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत संपूर्ण राज्यामध्ये सर्वप्रथम पूर्ण केले. यासाठी शासनाने महापालिकेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर सेक्टर-३४, ३५ मध्ये भीषण ‘पाणी टंचाई'