कळंबोली सर्कलवरील उड्डाणपुलाच्या कामाला गती

नवीन पनवेल : पनवेल येथील कळंबोली सर्कल येथे उड्डाणपुलाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग, जेएनपीटी मार्ग आणि शहरांतर्गत वाहतुकीचा संगम असलेल्या या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेला सदर प्रकल्प नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरु आहे.

प्रकल्प अंतर्गत एकूण ८ आर्म (मार्ग) आणि २ अंडरपास उभारण्यात येणार आहेत. शिळफाटा ते स्टील यार्ड, पुणे ते शिळफाटा, पुणे ते मुंबई, पनवेल ते मुंबई, मुंबई ते पनवेल, मुंबई ते जेएनपीटी, जेएनपीटी ते पुणे आणि शिळफाटा ते पुणे अशा विविध दिशांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच पनवेल ते शिळफाटा, पनवेल ते स्टील यार्ड या २ अंडरपासमुळे स्थानिक वाहतुकीलाही मोठी मदत होणार आहे. या उड्डाणपुलामुळे कळंबोली सर्कलवरील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहन चालकांच्या वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरु आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे, जेएनपीटी आणि पनवेल दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्प फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कळंबोली सर्कलवरील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ७ उड्डाणपुल, २ उपसरणी (अंडरपास) आणि ४५ जोडमार्ग उभारण्यात येणार आहेत. काही उड्डाणपुलांसाठी पाया, पाईलिंग आणि गर्डर बसविण्याची कामे सुरु झाली आहेत. तसेच सेवा रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन वळणमार्गांची उभारणी आणि बांधकाम क्षेत्राभोवती सुरक्षात्मक बॅरिकेडस्‌ उभारण्यात आले आहेत.

प्रकल्पाचे मॅनेजिंग हेड ऋषिकेश कोरडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कळंबोली सर्कलवरील बहुस्तरीय प्रकल्प वाहतूक कोंडीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय आहे. काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही विशेष दक्षता घेत आहोत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह सिग्नल-विरहित आणि अधिक सुरळीत होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. २०२७ अखेरपर्यंत सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे ऋषिकेश कोरडे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढते रेल्वे अपघात; ‘राष्ट्रवादी'चा रेल्वे प्रशासनाला अल्टीमेटम