केडीएमसी कचरा कंत्राटदाराच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त

‘केडीएमसी'तर्फे आरोपावर स्पष्टीकरण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा संकलन करण्यासाठी सुमित एल्को या कंपनीला ठेका दिला असून या कंपनीच्या अनागोंदी कारभाराने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा जमा करण्यास सांगितले जाते. मात्र, नंतर सदर कचरा एकाच गाडीत टाकण्यात येतो. या कंत्राटदाराच्या कामगारांनी कचरा घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केला असून यामुळे सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पण, असे काही झालेच नाही. मात्र, या प्रकरणाची शहानिशा करणार असल्याचे स्पष्टीकरण ‘केडीएमसी'चे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांनी दिले आहे.

गेल्या ५ वर्षात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका झाल्या नसून नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. महापालिकेने किमान कचरा तरी नियमित उचलला पाहिजे. जेणेकरुन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील. कचऱ्याच्या बाबतीत महापालिकेचा अनागोंदी कारभार सुरु असून ‘केडीएमसी'ने कचरा संकलानाचा ठेका दिलेली कंपनीकडे वाहनांची संख्या कमी असून कचरा गाड्या वेळच्यावेळी पोहोचत नसल्याने जागोजागी कचरा पडलेला आहे. त्यात भर म्हणून सदर कामगार नागरिकांकडे कचरा उचलण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप मोरेश्वर भोईर यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने संबंधित कंपनीला समज देऊन नियमित कचरा उचलण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत ‘केडीएमसी'चे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांना विचारले असता, घंटागाडी वरील सर्व कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले असून शहनिशा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण देखील केले जात असून वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था देखील उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माझा शुभम आता कधीही हातांनी काही करु शकणार नाही